दोनशेपेक्षा अधिक वीटभट्टी कारखाने होणार बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 10, 2021 04:14 IST2021-03-10T04:14:24+5:302021-03-10T04:14:24+5:30
नांदगाव पेठ : येथील एका वीज प्रकल्पामधील राख वाहून नेण्यासाठी शासनाने निर्धारित केलेल्या दराच्या शंभरपटीने भाव वाढविल्याने दोनशेपेक्षा अधिक ...

दोनशेपेक्षा अधिक वीटभट्टी कारखाने होणार बंद
नांदगाव पेठ : येथील एका वीज प्रकल्पामधील राख वाहून नेण्यासाठी शासनाने निर्धारित केलेल्या दराच्या शंभरपटीने भाव वाढविल्याने दोनशेपेक्षा अधिक वीटभट्टी कारखाने बंद होण्याच्या मार्गावर आहेत. गरिबांसाठी वीट आता दिवसेंदिवस महाग होत असून, आता गरिबांच्या घराचेही स्वप्न धूसर होत असल्याने शंभरपेक्षा अधिक वीटभट्टी मालकांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर केले.
वीटभट्टी मालकांनी राख वाहून नेण्यासाठी कर्ज घेऊन वाहने घेतली. मात्र, आज ती वाहने वाढीव दरामुळे धूळखात पडलेली आहे. गेल्या वर्षभरापासून वीटभट्टीमालकांना सदर कंपनी वेठीस धरत असून शासनाच्या नियमांना पायदळी तुडविण्याचे काम करत असल्याचा आरोप करत वीटभट्टी असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन शासनाने निर्धारित केलेले दर लागू करण्यात यावे, वीटभट्टीमालकांची पिळवणूक थांबवावी, अन्यथा याविरोधात सर्व वीटभट्टीमालक बेमुदत उपोषण करतील, असा इशारा वीटभट्टी असोसिएशनचे राजू चिरडे, धीरज चौहान, राजू लाड, मोहन दरोडी, बलवीर चौहान, किशोर अंबाडकर, सुधीर अंबाडकर, देविदास बांडाबुचे, राजू दातीर, गोयल सेठ, कैलास रतोडे, सुभाष ईखार, राजू दारोकार, शेख मिनाज, शेख साजिद, बशीर, चंदू बोंडे, हरिभाऊ कळंबे, भैयासाहेब निर्मळ, गजू तिजारे, राजेंद्र दारोकर, अजय मोरवाल यांनी दिला आहे.