ग्रामपंचायतींची अर्धेअधिक सदस्यपदे रिक्त; पोटनिवडणुकांसाठी जिल्ह्यात १२४ अर्ज
By गजानन उत्तमराव मोहोड | Updated: May 3, 2023 17:11 IST2023-05-03T17:11:29+5:302023-05-03T17:11:38+5:30
याशिवाय अनेक पदांसाठी एकही उमेदवारी अर्ज प्राप्त नसल्यामुळे व जात वैधता प्रमाणपत्राअभावी बहुतांश पदे रिक्त राहणार असल्याची माहिती आहे.

ग्रामपंचायतींची अर्धेअधिक सदस्यपदे रिक्त; पोटनिवडणुकांसाठी जिल्ह्यात १२४ अर्ज
गजानन मोहोड
अमरावती - जिल्ह्यात ७५ ग्रामपंचायतीच्या दोन थेट सरपंच व ११४ सदस्यपदांसाठी मुदतीत फक्त १२४ उमेदवारी अर्ज दाखल झालेले आहेत. याशिवाय उमेदवारी माघारीच्या ८ मे या अंतिम दिवसापर्यंत आणखी काही अर्ज माघारी होणार आहेत. त्यामुळे अर्धेअधिक सदस्यपदे यावेळी पुन्हा रिक्त राहणार आहे. निधन, राजीनामा, अनर्हता यासह अन्य कारणांमुळे ग्रामपंचायती पदे रिक्त राहिली होती. या सर्व पदांसाठी १८ मे रोजी मतदान होणार आहे. सध्या उमेदवारी अर्जाची प्रक्रिया आटोपली. आता छाननी दरम्यानही काही अर्ज बाद होणार आहे. याशिवाय अनेक पदांसाठी एकही उमेदवारी अर्ज प्राप्त नसल्यामुळे व जात वैधता प्रमाणपत्राअभावी बहुतांश पदे रिक्त राहणार असल्याची माहिती आहे.
या निवडणुकीत जात वैधता प्रमाणपत्र नसल्यास समितीकडे प्रस्ताव सादर केल्याचा पुरावा व निवडून आल्याचे एक वर्षाचे आता प्रमाणपत्र सादर करील असे हमीपत्र उमेदवारी अर्जासोबत ग्राह्य धरण्यात येणार आहे. याविषयीचे परिपत्रक निवडणूक आयोगाद्वारा अखेरच्या दिवशी जारी करण्यात आले. मात्र, उमेदवारांपर्यंत ही माहिती पोहोचलीच नसल्याने अनेक उमेदवार आता बाद होणार आहे.
तालुकानिहाय प्राप्त उमेदवारी अर्ज
जिल्हा निवडणूक विभागाचे माहितीनूसार भातकुली तालुक्यात ५ सदस्यपदांसाठी (४ अर्ज), नांदगाव खंडेश्वर ३ (२), अंजनगाव सुर्जी २(२), चांदूर रेल्वे १ (६), अमरावती ३ (७), चांदूरबाजार ३ (४), धामणगाव ५ (११), तिवसा २ (३), चिखलदरा १४ (२३), धारणी १४ (२३), दर्यापूर १२ (२६), अचलपूर १(निरंक), मोर्शी ६ (२)व वरुड तालुक्यात ४ (६ अर्ज) दाखल आहेत.