हिंसाचाराच्या तक्रारींचा ओघ, अटकेतील आरोपींची संख्या २७८ पार !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 19, 2021 10:12 AM2021-11-19T10:12:14+5:302021-11-19T10:26:39+5:30

आज (१९ नोव्हेंबर) दुपारी ३ वाजता इंटरनेट बंदीचा आढावा घेतला जाणार आहे. यादरम्यान माजी मंत्री जगदीश गुप्ता व निषाद जोध यांना १५ दिवस शहराबाहेर राहण्याचे आदेश स्थानिक न्यायालयाने बुधवारी सायंकाळी दिले. 

more than 278 accused arrested in amravati violence | हिंसाचाराच्या तक्रारींचा ओघ, अटकेतील आरोपींची संख्या २७८ पार !

हिंसाचाराच्या तक्रारींचा ओघ, अटकेतील आरोपींची संख्या २७८ पार !

Next
ठळक मुद्देअटकसत्र सुरुच माजी मंत्री गुप्तांसह दोघांना शहरबंदी

लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : शुक्रवार, शनिवारी शहरात उसळलेल्या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर तक्रारींचा ओघ सुरुच असून, विविध पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्याची संख्या ५० वर पोहोचली आहे. तब्बल १६ हजार जणांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. गुरुवारी सायंकाळपर्यंत अटक आरोपींची संख्या २७८ पार पोहोचली आहे.

आज (१९ नोव्हेंबर) दुपारी ३ वाजता इंटरनेट बंदीचा आढावा घेतला जाणार आहे. यादरम्यान माजी मंत्री जगदीश गुप्ता व निषाद जोध यांना १५ दिवस शहराबाहेर राहण्याचे आदेश स्थानिक न्यायालयाने बुधवारी सायंकाळी दिले. 

शहरातील  विविध ठिकाणी १३ नोव्हेंबर रोजी उफाळलेल्या हिंसाचार, दगडफेक, नासधूस, लूटपाट व प्रक्षोभक वक्तव्य केल्याप्रकरणी १७ नोव्हेंबर रोजीदेखील गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. १३ नोव्हेंबर रोजी सकाळी ते रात्रीपर्यंत झालेल्या अनेक घटनांमध्ये १७ नोव्हेंबर रोजी शहर कोतवाली, नागपुरी गेट, खोलापूरी गेट, गाडगेनगर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले. 

आज सकाळी ९ ते १२ व दुपारी ३ ते ६ या कालावधीत संचारबंदीमध्ये शिथिलता देण्यात आली आहे. 
जातीय सलोखा बळकट करण्याच्या हेतूने शहरातील संवदेनशील भागात पोलीस आयुक्त डॉ. आरती सिंह यांच्या नेतृत्वात डीसीपीद्वय विक्रम साळी व एम.एम. मकानदार, सहायक आयुक्त भारत गायकवाड व पूनम पाटील ही मंडळी अहोरात्र कॉर्नर मीटिंग घेऊन एकात्मतेचा जागर करीत आहेत.

प्रक्षोभक वक्तव्यापोटी गुन्हे 

शहर कोतवाली पोलिसांनी आमदार प्रवीण पोटे, भाजपचे महापालिकेतील गटनेता तुषार भारतीय, माजी मंत्री अनिल बोंडे, प्रदेश प्रवक्ता शिवराय कुळकर्णी, माजी मंत्री जगदीश गुप्ता व अन्य ५० ते ६० जणांविरुद्ध भादंविचे कलम २९५ अ, १५३, १५३ ब, ५०५ अ, ब, २९८ अन्वये गुन्हे दाखल केले. आमदार प्रवीण पोटे, तुषार भारतीय, एक महिला, शिवराय कुळकर्णी, अनिल बोंडे यांच्याविरुद्ध शहर कोतवाली पोलिसांनी स्वतंत्र असा कलम १४३, १४७, १४८, , १४९, ३५३, ३३३, ३३६, १०७, ४२७ अन्वये गुन्हा दाखल केला. त्यांनी पोलिसांच्या दिशेने दगडफेक केली. शासकीय कामकाजात अडथळा, जिवे मारण्याच्या हेतूने हल्ल्याचा आरोपदेखील त्यांच्यावर ठेवण्यात आला. ठाणेदार नीलिमा आरज यांनी प्रसारित ध्वनीचित्रफितीच्या आधारे ते गुन्हे दाखल केले.

माजी पालकमंत्रीद्वयांसह १४ जणांना जामीन 

माजी पालकमंत्री प्रवीण पोटे व जगदीश गुप्ता यांच्यासह अन्य १२ जणांना बुधवारी उशिरा रात्री न्यायालयाने जामीन मंजूर केला. शहर कोतवाली पोलिसांनी अटक केलेल्या या १४ जणांवर राजकमल चौकात जमावासमोर प्रक्षोभक वक्तव्य केल्याचा आरोप आहे. त्यांना १७ नोव्हेंबर रोजी सायंकाळी अटक करण्यात आली. त्यांना बुधवारी रात्री न्यायालयासमोर हजर करण्यात आले. सुनावणीदरम्यान न्यायालयाने तपास अधिकाºयाचे बयाण नोंदवून घेत, सर्वांची जामिनावर मुक्तता केली. त्यामुळे भाजप गोटात समाधान व्यक्त करण्यात आले. उर्वरित १२ जणांमध्ये भाजप, बजरंग दल व अन्य काही संघटनांच्या कार्यकर्त्यांचा समावेश आहे.

Web Title: more than 278 accused arrested in amravati violence

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.