मान्सून विदर्भाच्या उंबरठ्यावर
By Admin | Updated: June 17, 2017 00:06 IST2017-06-17T00:06:15+5:302017-06-17T00:06:15+5:30
मान्सूनसाठी अनुकूल परिस्थिती असून तो लवकरच विदर्भात प्रवेश करणार असल्याचे हवामानतज्ज्ञांचे मत आहे.

मान्सून विदर्भाच्या उंबरठ्यावर
अमरावती : मान्सूनसाठी अनुकूल परिस्थिती असून तो लवकरच विदर्भात प्रवेश करणार असल्याचे हवामानतज्ज्ञांचे मत आहे. बंगालच्या उपसागरावर कमी दाबाचे क्षेत्र व चक्राकार वारे असल्यामुळे विदर्भातील काही ठिकाणी हलका, मध्यम तर काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे.
जिल्ह्यात काही ठिकाणी कधी उकाडा तर कधी गारवा, असे वातावरण असल्याने नागरिकांना हवामानाचा नीट अंदाज येत नसल्याचे दिसते. मात्र, हवामानतज्ज्ञ अनिल बंड यांच्या मते, आसामच्या आसपास ९०० मीटर उंचीवर चक्राकार वारे असून त्याचबरोबर ओरिसावर सुद्धा चक्राकार वारे वाहत आहेत. तेथून कोकणपर्यंत कमी दाबाची द्रोणिय स्थिती अहे. कर्नाटक ते केरळच्या समुद्रात कमी दाबाची द्रोणिय स्थिती असून पंजाब ते आसाम व बिहार ते ओरिसा कमी दाबाची द्रोणिय स्थिती आहे. या स्थितीमुळे १५ जून रोजी बहुतेक ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस तर काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. १७ व १८ जून रोजी बहुतेक ठिकाणी पाऊस पडणार आहे. १९ ते २१ जून दरम्यान सार्वत्रिक पाऊस पडणार आहे. त्यामुळे या पावसाला मान्सुनचा पाऊस समजण्यास हरकत नसल्याचे बंड यांचे म्हणणे आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार मुंबई, नाशिकात मान्सून दाखल झाला असून तो विदर्भाकडे वेगाने वाटचाल करीत आहे. विदर्भात कधीही मान्सूनचे आगमन होऊ शकते. त्यामुळे शेतकऱ्यांनी पेरणीची जय्यत तयारी केली आहे.