ंजमिनीत गाडलेले माकडाचे पिलू तीन दिवसानंतर बाहेर काढले
By Admin | Updated: April 28, 2016 00:13 IST2016-04-28T00:13:38+5:302016-04-28T00:13:38+5:30
माकडाच्या पिल्याचा आकस्मिक मृत्यू झाल्यानंतर ते पिलू स्थानिक गणेश कॉलनी येथील महापालिकेच्या महाराणा प्रताप उद्यानात जमिनीत गाडण्यात आले.

ंजमिनीत गाडलेले माकडाचे पिलू तीन दिवसानंतर बाहेर काढले
वनविभागाच्या सुपूर्द : गणेश कॉलनी उद्यानात उघडकीस आला प्रकार
अमरावती : माकडाच्या पिल्याचा आकस्मिक मृत्यू झाल्यानंतर ते पिलू स्थानिक गणेश कॉलनी येथील महापालिकेच्या महाराणा प्रताप उद्यानात जमिनीत गाडण्यात आले. हीे घटना सोमवारी निदर्शनास आली. परिणामी जमिनीत गाडण्यात आलेले माकडाचे पिलू तीन दिवसानंतर बुधवारी वनविभागाच्या मदतीने बाहेर काढण्यात आले.
महापालिका उद्यान विभागाचे अधीक्षक प्रमोद येवतीकर यांनी दिलेल्या माहितीनुसार गणेश कॉलनी येथे महाराणा प्रताप उद्यानात रविवारी एका माकडाचे पिलू उद्यानात आणून गाडले. हे पिलू कोणी आणून गाडले, याचा शोध लागू शकला नाही. कारण रविवारी चौकीदार सुटीवर असल्यामुळे हा प्रकार झाला, असा अंदाज आहे. उद्यानात माकडाचे पिलू गाडल्यानंतर त्या जागेवर पूजा- अर्चा सुद्धा करण्यात आली. माकडाचे पिलू कुठेतरी आकस्मिकरित्या मृत पावल्यानंतर उद्यानात आणून गाडले. कालांतराने या जागेवर मंदिर उभारता येईल, असा हेतू काही जणांचा असावा, असे येवतीकर म्हणाले. मात्र माकडाचे पिलू कशाने मृत पावले, याची शहानिशा करण्यासाठी वनविभागाला पत्र देवून बुधवारी ते बाहेर काढण्यात आले. साधारणपणे तीन ते चार महिन्यांचे हे पिलू असावे, असा अंदाज आहे. माकडाचे पिलू बुधवारी बाहेर काढताच परिसरात दुर्गंधी पसरली होती. मात्र भविष्यात या उद्यानात मंदिर बांधून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता होती. त्यामुळे हे पिलू वनविभागाच्या स्वाधीन करण्यात आले आहे. वनकर्मचाऱ्यांनी पंचनामा करुन सदर पिलू ताब्यात घेतले. त्यानंतर या पिल्याची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. वडाळी वनविभागाच्या परिसरात हे पिलू गाडण्यात आले आहे. (प्रतिनिधी)
माकडाच्या पिल्याचा कशाने मृत्यू झाला असावा, याचा शोध घेण्यासाठी ते वनविभागाच्या ताब्यात देण्यात आले आहे. उद्यानात जमिनीत गाडण्याची परवानगी दिली नाही. त्यामुळे मृत माकडाचे पिलू पूजा-अर्चा करुन वैद्यकीय तपासणीसाठी पाठविण्यात आले.
- प्रमोद येवतीकर
अधीक्षक, उद्यान विभाग महापालिका.