पैसे काढून ती तिजोरी रोखपालाच्या पतीनेच फेकली कचऱ्यात
By Admin | Updated: February 9, 2016 00:13 IST2016-02-09T00:13:27+5:302016-02-09T00:13:27+5:30
नवाथेनगर चौक स्थित एका कार शोरुममधून तिजोरी चोरी गेल्याची घटना सोमवारी उघडकीस आली.

पैसे काढून ती तिजोरी रोखपालाच्या पतीनेच फेकली कचऱ्यात
अमरावती : नवाथेनगर चौक स्थित एका कार शोरुममधून तिजोरी चोरी गेल्याची घटना सोमवारी उघडकीस आली. या प्रकरणात शोरुममधील महिला रोखपालाचे पती सच्चिदानंद तिवारीला राजापेठ पोलिसांनी नागपूरवरून ताब्यात घेतले आहे. त्याने तिजोरीतील ९५ हजारांची रोख लंपास करून ती तिजोरी कचरा कंटेनरमध्ये फेकल्याची कबुली दिली आहे.
बडनेरा मार्गावरील नवाथेनगरस्थित महागड्या चारचाकी वाहनाचे शोरूम आहे. शोरूममधील मॅनेजर राहुल भुयार यांनी पोलिसांना दिलेल्या माहितीवरून सोमवारी सकाळी १० वाजता ते शोरूम उघडण्याकरिता आले. त्यांना शोरुमधील त्यांच्या कक्षांची दारे उघडी दिसली तसेच तिजोरीही गायब असल्याचे आढळून आले. त्यामुळे त्यांनी तत्काळ या घटनेची माहिती राजापेठ पोलिसांना दिली. काही वेळात पोलीस निरीक्षक एस.एस. भगत आणि पोलीस उपनिरीक्षक डेडवाल त्यांच्या पोलीस पथकासह घटनास्थळी पोहचले. गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिलीप पाटील यांनीही घटनास्थळी भेट दिली. श्वान पथक व ठसे तज्ज्ञांचेही पाचारण झाले. चोरट्यांनी शोरूममधील शौचालय व बाथरुमच्या खिडकीचे काचा फोडून शोरुममध्ये प्रवेश केल्याची पोलिसांचे निदर्शनास आले. पोलिसांनी तपासकार्य सुरू करून आजूबाजूच्या परिसरात शोधकार्य सुरू केल्यानंतर शोरुम मागील महावीरनगरातील एका कचरा कंटेनरमध्ये तिजोरी आढळून आली. पोलिसांनी ती तिजोरी जप्त करून पोलीस ठाण्यात ठेवली आहे. मात्र, तिजोरीची चावी शोरुमच्या महिला रोखपालाकडे असल्यामुळे अद्याप चावी पोलिसांच्या हाती लागली नव्हती. त्यातच महिला रोखपाल २१ जानेवारीपासून सुट्टीवर असल्यामुळे त्या नागपूर येथे गेल्या होत्या. त्यांच्याशी पोलिसांनी संपर्क केला असता तिजोरीची चावी त्याच्याजवळच असल्याचे पोलिसांना कळले. त्यानुसार पोलीस नागपूर येथे रवाना झाले. पोलिसांनी आरोपी सच्चिदानंद ऊर्फ पिंटू तिवारी याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्यानेच तिजोरीतील ९५ हजार रुपये चोरले व चोरीचा बनावासाठी ती तिजोरी कचऱ्यात फेकल्याची कबुली पोलिसांना दिली. सच्चिदानंदसोबत आणखी एक आरोपीची असल्याची माहिती पोलिसांना मिळाली असून त्याचा शोध पोलीस घेत आहे.
रोखपालाच्या पतीने चोरीचा बनाव केल्याचे निदर्शनास येत आहे. त्याने तिजोरीतील रक्कम चोरून तिजोरी फेकून दिल्याचे समजते. रोखपालाच्या पतीला ताब्यात घेतले असून त्यांची चौकशी सुरू आहे.
- एस.एस.भगत, पोलीस निरीक्षक, राजापेठ पोलीस ठाणे.