आंतरजिल्हा बदल्याचा मुहूर्त दिवाळीनंतर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2021 04:18 IST2021-09-08T04:18:02+5:302021-09-08T04:18:02+5:30
अमरावती : एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात बदलून जाण्यासाठी जिल्ह्यासह राज्यभरातील जवळपास ११ हजारावर शिक्षक इच्छुक आहेत. ...

आंतरजिल्हा बदल्याचा मुहूर्त दिवाळीनंतर
अमरावती : एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात बदलून जाण्यासाठी जिल्ह्यासह राज्यभरातील जवळपास ११ हजारावर शिक्षक इच्छुक आहेत. कोरोना संसर्गामुळे बदल्याची प्रक्रिया लांबली होती.आता आंतरजिल्हा व जिल्हांतर्गत बदल्यांमध्ये पारदर्शकता राहावी म्हणून बदली ही प्रक्रिया ऑनलाइन केली जाणार आहे. त्यासाठी स्वतंत्र स्वॉफ्टवेअर विकसित केले असून, दिवाळी अगोदर किंवा दिवाळीनंतर शिक्षकांच्या बदल्या ऑनलाइन पध्दतीने होण्याचे संकेत मिळत आहेत.
जिल्हा परिषदेत शिक्षक म्हणून नोकरीला लागताना सर्व प्रकारच्या अटी व शर्थी मान्य करून अनेकजण दुसऱ्या जिल्ह्यात सहशिक्षक पदावर रुजू झाले. पाच वर्षे एकाच जिल्ह्यात काम केल्यानंतर संबंधित शिक्षक आंतरजिल्हा बदलीसाठी पात्र ठरतो. दुसरीकडे, तो शिक्षक ज्या प्रवर्गातून त्या ठिकाणी रुजू झाला आहे, त्या प्रवर्गाची जागा रिक्त असल्यानंतर त्याला आंतरजिल्हा बदलीतून संधी दिली जाते. मात्र, अनेक शिक्षकांनी बदलीसाठी प्रयत्न करूनही त्यांना त्यांच्या जिल्ह्यात बदली मिळालेली नाही. दुसरीकडे, जिल्हांतर्गत बदल्या दरवर्षी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, प्राथमिक शिक्षणाधिकारी यांच्या स्तरावरून केल्या जात होत्या. मात्र, त्यामध्येही पदाधिकाऱ्यांचा हस्तक्षेप होत असल्याच्या तक्रारी काही शिक्षकांनी थेट ग्रामविकास विभागाकडे केल्या. त्यामुळे आता आंतरजिल्हा व जिल्हांतर्गत बदल्या ऑफलाइन नव्हे तर ऑनलाइन पद्धतीनेच होतील असे ग्रामविकास मंत्री यांनी स्पष्ट केले. ग्रामविकास विभागाने शिक्षकांच्या बदल्यांसाठी एक स्वतंत्र स्वॉफ्टवेअर तयार केले आहे. दिवाळीच्या निमित्ताने शिक्षकांना पारदर्शक बदल्यांची धामधुम सुरू होणार असल्याने शिक्षकांनाही दिलासा मिळण्याची शक्यता आहे.