अमरावती : येथील विभागीय क्रीडा संकुलच्या मैदानात मॉर्निंग वाॅकला आलेल्या महिलेची छेडखानी करून तिचा पाठलाग केला व अश्लील शिवीगाळ करून विनयभंग केल्याची घटना सोमवारी सकाळी मैदानात घडली. याप्रकरणी एका युवकावर गाडगेनगर पोलिसांनी गुन्हा नोंदविला. पण दुसऱ्या दिवशी मंगळवारीसुद्धा तो तरुण मैदानात आला. त्याने येथील नेटबॉलच्या कोटवर काही तरुणांसोबत हॉलिबॉलसुद्धा खेळल्याचे येथील काही खेळाडूंनी सांगितले. विनयभंगाच्या गुन्ह्यानंतरही सदर आरोपी त्या ठिकाणी येत असल्याने इतर खेळाडूंच्या मनात असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे. अशांना क्रीडा संकुल प्रशासन पायबंदी घालेल का, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
ज्या विवाहित महिलेचा विनयभंग झाला, तिने मात्र मंगळवारी मैदानाच्या रनिंग ट्रॅक्वर मॉर्निंग वाॅकला येण्याचे टाळले. परंतु विनयभंगाच्या गुन्ह्यानंतरसुद्धा या गुन्ह्यातील इम्रान अली अलवाय अली (३२, रा. अलहिलाल कॉलनी अमरावती) आरोपीला न्यायालयाने जमानत देताच तो दुसऱ्या दिवशी मैदानावर पुन्हा दाखल झाला. त्याने तेथे खेळण्याची कुठलीही परवानगी न घेता नियमाबाह्यरीत्या नेटबॉलच्या कोटवर जाऊन पुन्हा हॉलिबॉल खेळले. त्याने एका धिप्पाड शरीरयष्टीच्या तरुणाला सोबत आणले होते. कुठलाही वाद होऊ नये, म्हणून तेथे नियमित सराव करणाऱ्या खेळाडूंनी त्याला विरोध केला नाही. मात्र, नियमबाह्यरीत्या मैदानात शिरून राजरोजसपणे त्याने इतर खेळाडूंसोमर वावरण्याचा प्रयत्न केल्याचे नाव न प्रकाशित करण्याच्या अटीवर येथील काही खेळाडूंनी सांगितले. मात्र विभागीय क्रीडा संकुलात बाहेरील टवाळखोर तरुणांचा वावर होत असताना क्रीडा संकुल प्रशासनाने अद्याप कुठलीही दखल घेतलेली नाही. अशा आरोपींना पायबंद घालावे तसेच पोलिसांनीसुद्धा तेथे गस्त वाढवावी, अशी मागणी होत आहे.
कोट
सदर आरोपीविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा तर नोंदविलाच तसेच कलम १५१,१०७,११६(३) नुसार प्रतिबंधक कारवाई केली आहे. क्रीडा संकूलात पोलिसांची गस्त वाढविण्यात येणार आहे.
- मनीष ठाकरे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, गाडगेनगर
कोट
बंदोबस्त वाढविण्याकरिता गाडगेनगर पोलिसांना पत्र दिले आहे. ते सहकार्यसुद्धा करीत आहेत. आमच्याकडे मनुष्यबळ कमी आहे. तरीही मी स्वत: संपुर्ण मैदानाचा फेरफटका मारून काही अनुचित प्रकार घडू नये, याकडे कटाक्षाने लक्ष देत आहे.
- गणेश जाधव, क्रीडा उपसंचालक, अमरावती