मोक्षधाम झाले वन उद्यान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2021 04:13 IST2021-03-16T04:13:33+5:302021-03-16T04:13:33+5:30
ममदापूर ग्रामस्थांनी केले मोक्षधाम सुंदर तिवसा : तालुक्यातील ममदापूर या छोट्याशा गावातील ग्रामस्थांनी श्रमदान व वर्गणीतून गावाला लागून असलेल्या ...

मोक्षधाम झाले वन उद्यान
ममदापूर ग्रामस्थांनी केले मोक्षधाम सुंदर
तिवसा : तालुक्यातील ममदापूर या छोट्याशा गावातील ग्रामस्थांनी श्रमदान व वर्गणीतून गावाला लागून असलेल्या मोक्षधामात रंगरंगोटी, झाडांची व्यवस्था करीत राष्ट्रसंत तुकडोजी यांच्या नावाने सुंदर असे वनउद्यान बनविले आहे. या ठिकाणी प्रसन्न वातावरण असल्याने विविध कार्यक्रमसुद्धा होत असतात. सरपंच मुकुंद पुनसे यांच्या पुढाकाराने हे शक्य झाले आहे.
अंधश्रद्धेला खतपाणी न देता गाडगे, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज व गाडगे महाराज यांनी आपल्या कीर्तनातून खेडोपाडी ग्रामस्थांचे प्रबोधन केले. दोहोंच्या सूत्रांचे पालन आज खेड्यापाड्यात झाले, तर गावे सुंदर व समृद्धीच्या मार्गाने वाटचाल करतील. याच विचारांनी प्रेरित होऊन ममदापूर येथील ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच, सचिव व ग्रामस्थांनी निर्धार करीत गावातील मोक्षधाम सुंदर करण्याची मोहीम हाती घेतले. मोक्षधाम परिसरात श्रमदान करीत सुमारे २०० रोपे लावण्यात आली व त्यांची निगा राखली जात आहे. त्यांना आता झाडाचे स्वरूप लावले आहे. पक्ष्यांकरिता पिण्याच्या पाण्याची व्यवस्थादेखील करण्यात आली आहे. अशा या ठिकाणी ‘गाव सुंदर मोक्षधाम सुंदर’ संकल्पनेचा उद्देश ठेवून ग्रामस्थांनी वनउद्यान फुलवून निसर्गमय वातावरण निर्माण केले आहे. याकरिता गावातील नागरिकांनी लोकवर्गणी व श्रमदान केले.
कोट
एमआरजीएस अंतर्गत या ठिकाणी २०० च्यावर झाडे लावली. त्याची चांगल्या प्रकारे काळजी घेऊन झाडाची संपूर्ण देखभाल केली. मोक्षधामस्थळी नागरिकांना प्रसन्नमय वातावरण मिळावे तसेच अंधश्रद्धा दूर व्हावी, याकरिता तुकडोजी महाराज व गाडगे महाराज यांचे विचार लिहिण्यात आले आहेत.
- मुकुंद पुनसे, सरपंच, ममदापूर