मनरेगाच्या कामात भ्रष्टाचार केल्यास ‘मकोका’!
By Admin | Updated: May 19, 2016 00:09 IST2016-05-19T00:09:18+5:302016-05-19T00:09:18+5:30
महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना (मनरेगा) योजनेंतर्गत कामामध्ये भ्रष्टाचार करणाऱ्या अधिकारी व कंत्राटदारावर ‘मकोका’ (संघटित गुन्हेगारी प्रतिबंध कायदा)

मनरेगाच्या कामात भ्रष्टाचार केल्यास ‘मकोका’!
अमरावती : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना (मनरेगा) योजनेंतर्गत कामामध्ये भ्रष्टाचार करणाऱ्या अधिकारी व कंत्राटदारावर ‘मकोका’ (संघटित गुन्हेगारी प्रतिबंध कायदा) अंतर्गत कारवाई करण्यात येणार आहे. यासंदर्भात मनरेगाच्या राज्य आयुक्तांनी जिल्हाधिकारी व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यपालन अधिकारी यांना पत्राद्वारे निर्देश दिले आहे.
मागील वर्षी कमी पाऊस झाल्याने राज्यात दुष्काळाची स्थिती निर्माण झाली आहे. अशा स्थितीत महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत अनेक ठिकाणी मजुरांना कामे उपलब्ध करून दिल्या जात नाहीत, अशा तक्रारी मनरेगाच्या नागपूर येथील आयुक्त कार्यालयाकडे दाखल आहेत त्या अनुषंगाने मनरेगा अंतर्गत कामाच्या नियोजनाची यादी ग्रामपंचायत पातळीवर उपलब्ध असणे आवश्यक आहे. जे अधिकारी मनरेगाअंतर्गत कामाचे नियोजन तयार ठेवणार नाहीत, अशा संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याचे निर्देशही मनरेगा आयुक्तांनी दिले आहे. याशिवाय मनरेगांतर्गत कामामध्ये भ्रष्टाचार करणाऱ्या संबंधित अधिकारी व कंत्राटदारांवर ‘मकोका’ अंतर्गत कारवाई करण्यात यावी. त्यासाठी संबंधित जिल्हाधिकाऱ्यांनी पोलीस अधीक्षकांसोबत चर्चा करून निर्णय घ्यावा, असे निर्देश मनरेगाचे आयुक्त अभय महाजन यांनी राज्यातील सर्व जिल्हाधिकारी तथा जिल्हा परिषदांचे मुख्य कार्यपालन अधिकारी व सहजिल्हा कार्यक्रम समन्वयकांना दिले आहे. (प्रतिनिधी)