पालिका हद्दीतच लागू राहणार आदर्श आचारसंहिता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 20, 2016 00:10 IST2016-10-20T00:07:21+5:302016-10-20T00:10:42+5:30

राज्य निवडणूक आयोगाने सोमवार १७ आॅक्टोबर रोजी नगरपरिषदांच्या सार्वत्रिक निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला .

Model Code of Conduct to be implemented within the limits of the municipal limits | पालिका हद्दीतच लागू राहणार आदर्श आचारसंहिता

पालिका हद्दीतच लागू राहणार आदर्श आचारसंहिता

पत्रकार परिषद : जिल्हाधिकारी किरण गित्ते यांची स्पष्टोेक्ती
अमरावती : राज्य निवडणूक आयोगाने सोमवार १७ आॅक्टोबर रोजी नगरपरिषदांच्या सार्वत्रिक निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला . त्यामुळे जिल्ह्यातील ९ नगरपरिषदांच्या हद्दीतच आदर्श आचारसंहिता लागू करण्यात आली आहे. त्यामुळे जिल्हा परिषद आणि महापालिकेच्या क्षेत्रातील विविध कामांवर या आचारसंहितेचा कुठलाही फरक पडणार नसल्याची माहिती जिल्हाधिकारी किरण गित्ते यांनी बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयात पत्रकार परिषदेत दिली.
पुढे बोलताना जिल्हाधिकारी किरण गित्ते म्हणाले, १७ आॅक्टोबरला राज्य निवडणूक आयोगाने पालिका निवडणुकीचा कार्यक्रम घोषित केला. तेव्हापासूनच आदर्श आचारसंहिता लागू करण्यात आली आहे. यावेळी ज्या जिल्ह्यात चारपेक्षा जास्त पालिकांची निवडणूक आहे, अशा ठिकाणी संपूर्ण जिल्ह्यात आदर्श आचारसंहिता लागू केल्याचे जाहीर केले. मात्र, या आचारसंहितेचा जिल्हा परिषद आणि महापालिकेला कुठलाही फरक पडणार नाही. परिणामी या स्थानिक स्वराज्य संस्थेत विकासकामे अथवा प्रशासकीय कामे करण्यास आचारसंहितेची अडचण नसल्याने विकासकामे थांबणार नसल्याचे जिल्हाधिकारी गित्ते यांनी स्पष्ट केले.
मात्र, पदाधिकाऱ्यांना शासकीय वाहनांचा वापर करता येणार नाही. मात्र, महापलिका व जिल्हा परिषदक्षेत्रात भूमिपूजन करता येईल, असे जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. आदर्श आचारसंहिता जिल्ह्यातील ९ नगरपरिषद क्षेत्रात जेथे निवडणूक आहे, तेथेच लागू राहणार आहे. चिखलदरा नगरपरिषद आणि धारणी, भातकुली, तिवसा, नांदगाव खंडेश्र्वर येथील नगपंचायतीच्या ठिकाणी आचार संहिता लागू राहणार नसल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले. निवडणूकीच्या कामकाजासाठी ज्या नियुक्त शासकीय अधिकाऱ्यांसमवेत आता कोणतेही लोकप्रतिनिधी बैठक घेऊ शकणार नसल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. याशिवाय शासकीय विश्रामगृहांचा उपयोग केवळ राहण्यासाठीच करता येईल, असेही गित्ते यांनी सांगितले.

३ हजार ५३० पदवीधर मतदारांची नोंदणी
आगामी पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीच्या अनुषंगाने नवीन मतदार नोंदणीचे काम जिल्ह्यात सुरू आहे. यासाठी आतापर्यंत ३ हजार ५३० नवीन मतदारांनी नोंदणी केली आहे. मतदार नोंदणीसाठी ५ नोव्हेंबर ही अंतिम मुदत आहे. मागील निवडणुकीदरम्यान जिल्ह्यात ७४ हजार मतदार होते. पदवीधर मतदारांनी मतदार नोंदणी करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी किरण गित्ते यांनी केले आहे.

Web Title: Model Code of Conduct to be implemented within the limits of the municipal limits

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.