मोकाट कुत्र्यांना आवर; निर्बिजीकरणाला वेग
By Admin | Updated: November 8, 2016 00:08 IST2016-11-08T00:08:10+5:302016-11-08T00:08:10+5:30
शहरात मोकाट कुत्र्यांचा वाढता हैदोस ही सामान्य नागरिकांसाठी डोकेदुखी ठरली आहे.

मोकाट कुत्र्यांना आवर; निर्बिजीकरणाला वेग
आयुक्तांचे निर्देश : पशूशल्य विभाग लागला कामाला
अमरावती : शहरात मोकाट कुत्र्यांचा वाढता हैदोस ही सामान्य नागरिकांसाठी डोकेदुखी ठरली आहे. या पार्श्वभूमिवर महापालिका आयुक्त हेमंतकुमार पवार यांनी सोमवारी पशूशल्य चिकित्सक विभागाची बैठक घेतली आणि मनपाद्वारे राबविण्यात येणाऱ्या श्वान निर्बिजीकरण आणि लसीकरण कार्यक्रमासाठी ५० लाखांची तरतूद करण्यात आल्याचे या बैठकीत सांगितले.
७ नोव्हेंबरपर्यंत ४७८८ श्वानांचे निर्बिजीकरण आणि लसीकरण करण्यात आले आहे. त्यामध्ये २००१ नर तर २७८७ इतक्या मादी आहेत. नर श्वानांचे प्रमाण ४२ टक्के करण्याचे निर्देश यावेळी देण्यात आलेत. मादी श्वानांचे अधिकाधिक निर्बिजीकरण व लसीकरण करण्याच्या सूचना महापालिका आयुक्तांनी यावेळी केल्यात. या कार्यक्रमात आतापर्यंत ३७ लाख रूपये खर्च करण्यात आले आहेत. याकरिता एजन्सीची नियुक्ती करण्यात आली होती. त्यापैकी एका एजन्सीचे काम सुरु झाले आहे. तर दुसऱ्या एजन्सीसाठी त्वरित जागा उपलब्ध करून देण्याचे निर्देश संबंधित अधिकाऱ्याला महापालिका आयुक्तांनी दिले आहेत. उर्वरित खर्चात राहिलेल्या श्वानांचे निर्बिजीकरण आणि लसीकरण करण्याचे धोरण ठरविण्याचे सक्त निर्देश आयुक्तांनी यावेळी दिलेत.
महानगरपालिकेतर्फे जानेवारी २०१५ ते डिसेंबर २०१५ पर्यंत ५६३ मोकाट जनावरे पकडण्यात आली असून २,७१,००० रूपये इतका दंड वसूल करण्यात आला. जानेवारी २०१६ ते आॅक्टोबर २०१६ पर्यंत ७३३ मोकाट जनावरे पकडून त्यांच्या मालकांकडून २,७३,००० ेइतका दंड वसूल करण्यात आला आहे. महापालिका आयुक्तांनी मोकाट जनावरे पकडण्याची कार्यवाही अधिक वेगाने करावी, असे निर्देश पशूशल्य विभागाला दिले आहेत. या मोहिमेमेमुळे शहरातील मोकाट कुत्र्यांच्या वाढत्या संख्येवर अंकुश बसणार आहे. (प्रतिनिधी)
महापालिका आयुक्तांच्या दिशानिर्देशाने मोकाट जनावरे पकडण्याची मोहीम अधिक वेगाने राबविली जाईल. मोकाट कुत्र्यांवर अंकुश राखला जाईल.
- सुधीर गावंडे,
पशू शल्यचिकित्सक, महापालिका