मोकाट गुरे : पायबंदासाठी ‘कलम १६३’ हाच उपाय
By Admin | Updated: October 28, 2014 22:50 IST2014-10-28T22:50:10+5:302014-10-28T22:50:10+5:30
शहरासह ग्रामीण भागातील मोठ्या गावात मोकाट जनावरांची समस्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. जनावरे पकडण्यासाठी कधी तरी मोहीम राबविली जाते. मोकाट जनावरांना पायबंद

मोकाट गुरे : पायबंदासाठी ‘कलम १६३’ हाच उपाय
अमरावती : शहरासह ग्रामीण भागातील मोठ्या गावात मोकाट जनावरांची समस्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. जनावरे पकडण्यासाठी कधी तरी मोहीम राबविली जाते. मोकाट जनावरांना पायबंद घालण्यासाठी प्रत्येक ग्रामपंचायतीने आपल्या कार्यक्षेत्रात ‘कलम १६३’ कायद्याची प्रभावीपणे अंमलबजावणी केल्यास या मोकाट जनावरांची समस्या निकाली निघू शकते.
तालुक्याच्या ठिकाणी गेल्या काही वर्षात मोकाट जनावरांनी उच्छाद मांडला आहे. मोकाट जनावरांमुळे वाहतुकीची कोंडी होऊन लहानमोठे अपघात नेहमीच होतात. सर्व नागरीक व वाहन चालक मोकाट जनावरांमुळे त्रस्त झाले आहेत. या समस्येवर तोडगा काढणे अद्याप शक्य झालेले नाही. मात्र, ग्रामपंचायतींनी पुढाकार घेतल्यास हे सहज शक्य आहे. मुंबई ग्रामपंचायत अधिनियम १९५८ मध्ये मोकाट जनावरांनापायबंद घालण्याचा नियम अधिसूचित आहे.
रस्त्यावर गुरे भटकू देणे, खासगी किंवा सार्वजनिक मालमत्तेवर अपप्रवेश करू देण्याबाबत हे ‘कलम १६३’ आहे. वारंवार होणाऱ्या ट्रॅफिक जाममुळे मुख्य रस्त्यावरील बाजारपेठेत अनेक समस्या उद्भवतात. त्यातच मोकाट गुरांच्या समस्येची भर पडली आहे. ही जनावरे चौकात, भररस्त्यात बैठक मारतात. भाजीबाजारात या गुरांचा कहर असतो. दुकानासमोर ठेवलेला भाजीपाला, वस्तू, केळी, आंबे, खाद्यपदार्थ सरळ ओढून नेतात यामुळे दुकानदारदेखील त्रस्त झाले आहे. ग्रामपंचायतींनी कायद्याची अंमलबजावणी केल्यास गुरांचा बंदोबस्त होऊ शकतो. (प्रतिनिधी)