मोबाईल कॉल रेकॉर्डची तपासणी थंडबस्त्यात!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2019 06:01 IST2019-09-15T06:00:00+5:302019-09-15T06:01:38+5:30
डॉ. राजेंद्र भट्टड यांचा मृतदेह त्यांच्याच गोदावरी हॉस्पिटलच्या रेस्ट हाऊसमध्ये ५ सप्टेंबर रोजी संशयास्पद स्थितीत सापडला. त्यांच्या मृत्युनंतर अनेक प्रश्न उपस्थित झालेत. पैकी कुठल्याही प्रश्नाचे समाधानकारक उत्तर स्थानिक पोलीस शोधू वा सांगू शकले नाहीत. ही सुसाईड मिस्ट्री की अन्य काही?

मोबाईल कॉल रेकॉर्डची तपासणी थंडबस्त्यात!
लोकमत न्यूज नेटवर्क
दर्यापूर : येथील प्रथितयश वैद्यकीय व्यावसायिक राजेंद्र भट्टड यांच्या संशयास्पद मृत्यूस नऊ दिवस उलटत असताना स्थानिक पोलीस ठोस निष्कर्षापर्यंत पोहोचले नाहीत. व्हिसेरा अहवाल अप्राप्त असल्यानेही तपासाला मर्यादा आली आहे, तर मृत डॉक्टरांच्या मोबाईलचा सीडीआर मिळाला नसल्याने तूर्तास प्रत्यक्षदर्शींच्या बयाणावर पोलिसांची मदार आहे.
डॉ. राजेंद्र भट्टड यांचा मृतदेह त्यांच्याच गोदावरी हॉस्पिटलच्या रेस्ट हाऊसमध्ये ५ सप्टेंबर रोजी संशयास्पद स्थितीत सापडला. त्यांच्या मृत्युनंतर अनेक प्रश्न उपस्थित झालेत. पैकी कुठल्याही प्रश्नाचे समाधानकारक उत्तर स्थानिक पोलीस शोधू वा सांगू शकले नाहीत. ही सुसाईड मिस्ट्री की अन्य काही? याचे उत्तर पोलिसांनी शोधायलाच हवे. डॉ. भट्टड यांच्या मृत्यूने समाजमन ढवळून निघाले असताना नऊ दिवसांनंतरही पोलीस प्राथमिक निष्कर्षाप्रत पोहोचू नयेत, त्यामागे मोठे गौडबंगाल असल्याची चर्चा दर्यापुरात जोर धरत आहे. डॉक्टरांच्या मृत्यूनंतर लागलीच घडलेल्या घटनक्रमातील अनेक बाबी संशयाला पूरक ठरल्या असताना आत्महत्येच्या प्राथमिक निष्कर्षावर थांबणे, कुठवर योग्य आहे, असा प्रश्न शहरात चर्चिला जात आहे. या हायप्रोफाईल व सेंसेशनल प्रकरणात तातडीने तपास अपेक्षित असताना डॉक्टरांचा मोबाईल पाचव्या दिवशी ताब्यात घेतला जातो, अन् चार दिवस उलटल्यानंतरही मोबाईल कॉल रेकॉर्ड मिळत नसेल, तर हे संशयास्पद प्रकरण दडपविण्याचा खटाटोप तर चाललाय नाही ना, अशी शंका घेणे वाजवी ठरते. या हायप्रोफाईल प्रकरणाचा गुंता सोडविण्यासाठी मोबाइल रेकॉर्ड महत्त्वाचा पुरावा असताना अद्यापही तो रेकॉर्ड तपासण्यात आलेला नाही किंवा त्याबाबतचा अहवाल स्थानिक पोलिसांना प्राप्त झालेला नाही. डॉ. भट्टड यांनी मृत्यूपूर्वी कुणाशी संवाद साधला याकडे सर्वांचे लक्ष आहे.
तपास अधिकारी बदलण्याची मागणी
होमगार्ड मृत्यूप्रकरणी तत्कालीन ठाणेदार दीपक वानखडे यांच्यावर मुख्यालय संलग्नची कारवाई करण्यात आली. त्यानंतर संवेदनशील दर्यापूर ठाण्याचा कारभार सहायक पोलीस निरीक्षक नरेंद्र डंबाळे यांच्यावर सोपविण्यात आला. दरम्यानच्या काळात डॉ. भट्टड यांचा संशयास्पद मृत्यू झाला. आपसूक तो तपास डंबाळे यांच्याकडे गेला. मात्र सदर प्रकरणाचा कासवगतीने होणारा तपास पाहता तपास अधिकारी बदलण्याची मागणी राजकिय व सामाजिक संघटनांनी केली आहे.
नेहमीप्रमाणे आलो, धावपळीने थबकलो
शनिवारी या प्रकरणात डॉ. भट्टड यांचे वाहनचालक विनोद अडबोल यांचे बयाण नोंदविण्यात आले. आपण नेहमीप्रमाणे सकाळी गोदावरी हॉस्पिटलमध्ये आलो. डॉक्टरांच्या मृत्यूच्या माहितीने थबकलो. धावपळही केली. मात्र, डॉक्टरांचा मृत्यू हृद्याघाताने, आत्महत्या केल्याने की अन्य कारणाने झाला, याबाबत आपण अनभिज्ञ असल्याचे बयाण अडबोल यांनी दिल्याची माहिती ठाणेदारांनी दिली.