मोबाईल, दुचाकी चोरीतील 'वन मॅन शो' पोलिसांच्या जाळ्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 28, 2018 00:27 IST2018-01-28T00:27:29+5:302018-01-28T00:27:45+5:30

मोबाईल, दुचाकी चोरीतील 'वन मॅन शो' पोलिसांच्या जाळ्यात
आॅनलाईन लोकमत
अमरावती : प्रत्येकाशी गोड बोलून, चेहऱ्यावर निरागस, सोज्ज्वळ हावभाव ठेवून कोणाचाही विश्वास संपादन करणाऱ्या एका अल्पवयीनाकडून पोलिसांनी ११ दुचाकी, नऊ मोबाईल व एक लॅपटॉप जप्त केला. विशेष म्हणजे, बऱ्यापैकी सुखवस्तू असलेल्या या चोराला मोबाइल, दुचाकीचोरीच्या पैशांतून मौजमस्ती करणे आणि मोठ-मोठ्या हॉटेलात जाऊन चविष्ट अन्नपदार्थांवर ताव मारायची सवयच जडली असल्याचे पोलीस चौकशीत पुढे आले आहे.
मोर्शी तालुक्यातील येरला येथील मूळ रहिवासी असलेल्या १७ वर्षीय मुलगा घरची परिस्थिती चांगली असल्यामुळे बाल्यावस्थेत अमरावतीत एका नामांकित शाळेत शिकला. त्याच्याकडे १४ एकर ओलीत शेती आहे. वडिलांचे निधन झाल्यानंतर तो आईसोबत राहू लागला. त्याने अर्ध्यातून शिक्षण सोडून दिले.
दरम्यान, एकदा अमरावती शहरात भटकताना त्याने सर्वप्रथम एका उघड्या घरातून मोबाइल चोरला. चोरी करणे सोपे वाटल्याने त्याचे धाडस वाढले. शहरातील गल्लीबोळात फिरून कोणाच्या दृष्टीस पडणार नाही अशाप्रकारे उघड्या घरांतून टेबलावर ठेवलेले मोबाइल लंपास करण्यात त्याने हातखंडा मिळविला. हे मोबाइल स्वस्त दरात विकायचा आणि त्या पैशांतून हॉटेलमध्ये विविध तºहेच्या खाद्यपदार्थांवर तो ताव मारायचा. यानंतर त्याने दुचाकीचोरीतही हात टाकला. शहरातील दुचाकी हेरून त्या चोरणे त्याने सुरू केले. चोरलेल्या दुचाकी खेडोपाडी राहणाºया गोरगरिब मजुरांना पाच-दहा हजारांत तो विकायचा. एखाद्याजवळ कमी पैसे असल्यास स्टॅम्प पेपरवर तो लिहून घ्यायचा. गेल्या काही महिन्यांत शहरात दुचाकी चोरीच्या घटना वाढल्या आहे. सोबतच उघड्या घरातून मोबाइल चोरी गेल्याचे प्रकार अनेक घडले आहेत. त्या अनुषंगाने राजापेठ पोलीस आरोपींच्या शोधात होते. दरम्यान तो अल्पवयीन चोर एका सीसीटीव्ही कॅमेºयात कैद झाला. त्याचा मोबाइल क्रमांक प्राप्त करून पोलिसांनी लोकेशन घेतले आणि त्याला शहरातील एका लॉजवरून ताब्यात घेतले. त्याच्या घरझडतीतून व चौकशीदरम्यान पोलिसांनी मोबाइल, दुचाकी, लॅपटॉप असा एकूण सहा लाखांचा मुद्देमाल जप्त केला. काही वर्षापूर्वी याच चोराला गाडगेनगर व राजापेठ पोलिसांनी अटक करून त्याच्याकडून चोरीची दुचाकी व मोबाइल जप्त केले होते.
अल्पवयीन चोराने चार दुचाकींचे क्रमांक बदलविल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. पोलिसांनी इंजिन क्रमाकांच्या आधारे दुचाकी ट्रेस केल्या आहेत. मोबाइल कोठून चोरले, याची पुढील चौकशी सुरू केली आहे.
पोलीस आयुक्त दत्तात्रय मंडलिक, उपायुक्त शशिकांत सातव, सहायक आयुक्त सोनोने यांच्या मार्गदर्शनात निरीक्षक किशोर सूर्यवंशी, तिवारी, एपीआय गजानन मेहेत्रे, पोलीस शिपाई रंगराव जाधव, फिरोज खान, सतीश देशमुख, मुन्ना चंदेल, राजेश गुरेले, दिनेश नांदे, दिनेश भिसे यांनी ही कारवाई केली.