शिधापत्रिकेवर आमदार कडूंचा शिक्का
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2018 22:25 IST2018-08-29T22:24:42+5:302018-08-29T22:25:28+5:30
स्थानिक तहसील कार्यालयामार्फत ‘आमदाराची राहुटी आपल्या गावात २०१८’ या अभियानांतर्गत घेतलेल्या शिबिरांमधून १८०० शिधापत्रिकांवर आ. बच्चू कडू यांच्या नावाचे शिक्के मारून शिधापत्रिका वितरित करण्यात आल्या होत्या. सदर शिधापत्रिकेवर बेकायदेशीर शिक्के मारणाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी नगरसेवक गोपाल तिरमारे यांनी अन्न व नागरी पुरवठामंत्री गिरीश बापट यांच्याकडे केली. त्यांनी याप्रकरणी उपोषणाचा इशारा दिला आहे.

शिधापत्रिकेवर आमदार कडूंचा शिक्का
लोकमत न्यूज नेटवर्क
चांदूर बाजार : स्थानिक तहसील कार्यालयामार्फत ‘आमदाराची राहुटी आपल्या गावात २०१८’ या अभियानांतर्गत घेतलेल्या शिबिरांमधून १८०० शिधापत्रिकांवर आ. बच्चू कडू यांच्या नावाचे शिक्के मारून शिधापत्रिका वितरित करण्यात आल्या होत्या. सदर शिधापत्रिकेवर बेकायदेशीर शिक्के मारणाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी नगरसेवक गोपाल तिरमारे यांनी अन्न व नागरी पुरवठामंत्री गिरीश बापट यांच्याकडे केली. त्यांनी याप्रकरणी उपोषणाचा इशारा दिला आहे.
शासनाच्या विविध योजनांचा लाभ व माहिती थेट नागरिकांपर्यंत पोहोचण्याच्या दृष्टीने राहुटी अभियानांतर्गत १ जानेवारी ते ६ फेब्रुवारी दरम्यान गावागावांत शिबिर पार पडले. दस्तावेज तपासून १८०० लाभार्थींना शिधापत्रिका देण्यात आल्या. मात्र, या शिधापत्रिकेवर ‘आमदार बच्चू कडू आमदाराची राहुटी आपल्या गावात २०१८’ असे शिक्के मारण्यात आल्याचा आरोप नगरसेवक गोपाल तिरमारे यांनी केला आहे. याबाबत नगरसेवक तिरमारे यांनी १५ जून व ७ जुलै रोजी तहसीलदार शिल्पा बोबडे यांना पत्राद्वारे शिधापत्रिकेवर आमदारांचे शिक्के कोणत्या अधिकाºयांच्या आदेशाने व कुठल्या शासननिर्णयाने मारण्यात आले, याबाबत चौकशीची मागणी केली होती.
तहसीलदार बोबडे यांनी यासंदर्भात सदर शिक्के अधिकाºयांच्या संमतीने मारले नसल्याचे सांगितले तसेच कागदपत्रे पडताळणीनंतर निरीक्षण अधिकारी, अचलपूर यांच्या स्वाक्षरीने रेशन कार्ड वितरित केल्याचे त्यांनी आपल्या चौकशीदरम्यान सांगितले. त्यानंतर नगरसेवक तिरमारे यांनी राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री गिरीश बापट यांच्यापुढे हे प्रकरण दाखल केले.
ना. बापट यांनी याप्रकरणी संबंधित विभागाच्या उपसचिवांंना आदेश दिले आहेत.
चुकीचे काय?
सदर शिधापत्रिका विशिष्ट जात, धर्म तसेच पक्षाच्या लाभार्थींना वितरित करण्यात आल्या नसल्याने यात चुकीचे काय, असा खडा सवाल लाभार्थींतर्फे उपस्थित केला जात आहे.
उपोषणाचा इशारा
शिधापत्रिकेवर नियमानुसार संबंधित अधिकाऱ्यांचा शिक्का असतो. कोणत्याही खाजगी व्यक्तींचा शिका किंवा नाव त्यावर नमूद करता येत नाही. याप्रकरणी दोषींवर कारवाई न झाल्यास येत्या २ आॅक्टोबरला बेमुदत उपोषण करण्याचा इशारा तिरमारे यांनी दिला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा नगरसेवक तिरमारे व आ. कडू यांच्यातील राजकीय कलगीतुरा रंगण्याची शक्यता आहे.