आमदारांनी केली वसतिगृहाची पोलखोल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 31, 2018 22:05 IST2018-10-31T22:05:37+5:302018-10-31T22:05:55+5:30
स्थानिक डॉ. बाबासाहेब आंबेडकर मुलींच्या शासकीय वसतिगृहातील विविध समस्यांचे निवारण करण्यासाठी मंगळवारी युवक काँग्रेसच्यावतीने समाजकल्याण उपायुक्तांना निवेदन देण्यात आले. निवेदन दिल्याच्या तासाभरातच समाजकल्याण उपायुक्तांनी वसतिगृहाला भेट दिली.

आमदारांनी केली वसतिगृहाची पोलखोल
लोकमत न्यूज नेटवर्क
चांदूर रेल्वे : स्थानिक डॉ. बाबासाहेब आंबेडकर मुलींच्या शासकीय वसतिगृहातील विविध समस्यांचे निवारण करण्यासाठी मंगळवारी युवक काँग्रेसच्यावतीने समाजकल्याण उपायुक्तांना निवेदन देण्यात आले. निवेदन दिल्याच्या तासाभरातच समाजकल्याण उपायुक्तांनी वसतिगृहाला भेट दिली. यावेळी उपायुक्तांसमोरच आ. वीरेंद्र जगताप यांनी विद्यार्थ्यांना विचारपूस केली असता, अनेक बाबी उघड झाल्या.
आ. वीरेंद्र जगताप व मंगला मून यांनी मंगळवारी सकाळी ७.३० वाजता वसतिगृहाला भेट देऊन मुलींची विचारपूस केली. दरम्यान धक्कादायक बाबी पुढे आल्या. यासंदर्भात युवक काँग्रेस कार्यकर्त्यांनी समाजकल्याण उपायुक्त मंगला मून यांना निवेदन दिले. वसतिगृहातील अनास्था, जेवण्यात अळ्या, दुपारचे जेवण शाळेच्या अवेळी, टाकीत दूषित पाणी, ती टाकी वर्षातून दोनदा धुतली जाते. शिळे अन्न दिले जाते. आरोग्यविषयी कुठलीही सुविधा नाही. मासिक भत्ता ६०० रुपये कधीच वेळेवर मिळत नाही. वॉर्डन अश्लील शिवीगाळ करतात. मुलींच्या रूमची, बाथरूमची सफाई त्यांच्याकडूनच करवून घेतली जाते आदी बाबी निवेदनात नमूद आहेत. यावेळी युवक काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष परीक्षित जगताप, पंकज मोरे, संदीप शेंडे, मोहम्मद शहजाद सौदागर, सागर यादव, नीलेश गुहे, सुमेध सरदार, राजू लांजेवार, सुजित माकोडे, सौरभ ईटके आदी उपस्थित होते.
निवेदन दिल्याच्या काही तासांतच समाजकल्याण उपायुक्त मंगला मून यांनी स्थानिक मुलींच्या वसतिगृहाला भेट दिली. यानंतर आ. जगतापसुद्धा वसतिगृहात आले होते. आ. जगताप यांनी उपायुक्तांसमोरच वसतिगृहातील मुलींना समस्येबाबत विचारणा केली.