आमदार राजकुमार पटेल यांचा जिल्हा बँक निवडणुकीत अर्ज खारीज?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2021 04:18 IST2021-09-08T04:18:26+5:302021-09-08T04:18:26+5:30

अमरावती : मेळघाटचे आमदार राजकुमार पटेल यांचा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक निवडणुकीत संचालकपदासाठीचा अर्ज खारीज झाला आहे. माजी महापौर ...

MLA Rajkumar Patel's application rejected in District Bank elections? | आमदार राजकुमार पटेल यांचा जिल्हा बँक निवडणुकीत अर्ज खारीज?

आमदार राजकुमार पटेल यांचा जिल्हा बँक निवडणुकीत अर्ज खारीज?

अमरावती : मेळघाटचे आमदार राजकुमार पटेल यांचा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक निवडणुकीत संचालकपदासाठीचा अर्ज खारीज झाला आहे. माजी महापौर प्रवीण काशीकर यांच्या हरकतीनंतर आमदार पटेल यांच्या अर्जाची छाननी करण्यात आली असून तूर्त निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी हा निकाल राखीव ठेवला आहे.

अमरावती जिल्हा सहकारी बँकेच्या ४ ऑक्टोबर रोजी होऊ घातलेल्या निवडणुकीत २१ संचालकपदांसाठी १८३ नामांकन दाखल करण्यात आले. नामांकन दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी माजी आमदार नरेशचंद्र ठाकरे यांचा एकमात्र नामांकन अर्ज असल्याने ते वरूड तालुका सेवा सहकारी सोसायटीमधून अविरोध विजयी होतील, असे संकेत आहेत. मात्र, नामांकन अर्ज छाननीच्या प्रक्रियेला मंगळवारी प्रारंभ होताच माजी महापौर प्रवीण काशीकर यांनी आमदार पटेल यांच्या अर्जावर हरकत नोंदविली. त्यानंतर विधिज्ञांच्या उपस्थितीत आमदार राजुकमार पटेल यांच्या अर्जाची छाननी करण्यात आली. आमदार पटेल यांनी अनुसूचित जमाती राखीव प्रवर्गातून संचालकपदासाठी नामांकन दाखल केला आहे. झिल्पी येथील सेवा सहकारी सोसायटी (नोंदणी क्रमांक ४०४) चे संचालक आमदार पटेल आहेत. १८३ पैकी पाच सदस्यांवर ९३ लाख रुपये बँकेचे कर्ज असल्याची हरकत नाेंदविली गेली होती. त्याअनुषंगाने झिल्पी येथील सेवा सहकारी सोसायटीच्या सचिवांचे बयाण नाेंदविले असता, कर्ज असल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे आमदार पटेल यांचे नामांकन वैध की अवैध, हा निर्णय बुधवारी जाहीर होणार आहे. मात्र, महाराष्ट्र सहकारी संस्था निवडणूक नियम, २०१४ चे कलम २०,२१ व २५ प्रमाणे आमदार पटेल हे पात्र नसल्यामुळे त्यांचा उमेदवारी अर्ज नामंजूर होईल, असे हरकतीनुसार प्रथमदर्शनी हे स्पष्ट होत आहे. त्यांचा नामांकन अर्ज खारीज होणे ही बाब राज्यमंत्री बच्चू कडू यांच्यासाठी धक्कादायक मानली जात आहे.

-----------------------

पटेल हे संचालक असल्याने होणार बाद

आमदार राजकुमार पटेल हे झिल्पी येथील सेवा सहकारी सोसायटीचे संचालक आहेत. सोसायटीचे संचालक

असताना सदस्यांवर कर्ज असले, तर जिल्हा बँकेत संचालक पदासाठी नामांकन दाखल करता येत नाही. केवळ सोसायटीचे सदस्य असते तर पटेल यांचे नामांकन कायम राहिले असते. मात्र, सोसायटीचे संचालक असल्यामुळे त्यांचा अर्ज बाद होईल, अशी नियमावली आहे.

कोट

आमदार राजकुमार पटेल यांच्या संचालक पदासाठीच्या नामांकन अर्ज छाननी दरम्यान हरकत नोंदविण्यात आली आहे. याबाबत कायदेशीर बाबी तपासण्यात आल्या असून, निर्णय राखीव ठेवण्यात आला आहे.

- महेंद्र चव्हाण, निवडणूक निर्णय अधिकारी, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक

Web Title: MLA Rajkumar Patel's application rejected in District Bank elections?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.