आमदार निधीतील बेंच कापून लावले घराच्या छताला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 8, 2021 04:11 IST2021-07-08T04:11:04+5:302021-07-08T04:11:04+5:30
शिंदी बु ग्रा पं सदस्याचा प्रताप : पोलिसांत तक्रार दाखल पथ्रोट : मेळघाटचे माजी आमदार प्रभुदास भिलावेकर यांच्या ...

आमदार निधीतील बेंच कापून लावले घराच्या छताला
शिंदी बु ग्रा पं सदस्याचा प्रताप : पोलिसांत तक्रार दाखल
पथ्रोट : मेळघाटचे माजी आमदार प्रभुदास भिलावेकर यांच्या निधीतून शिंदी बु. गावाला मिळालेल्या सार्वजनिक बेंचला कापून आपल्या घराच्या छताला लावल्याचा खळबळजनक प्रकार समोर आला असून, हा प्रताप नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्यांकडून केला गेल्याचे समोर आले आहे. ग्रामपंचायतीतर्फे पथ्रोट पोलीस ठाण्यात याबाबत तक्रारही दाखल करण्यात आली आहे.
काही दिवसांपूर्वी आमदार निधीतून शिंदी बु. गावाला मिळालेले बेंच चोरीला गेल्याचे गावकऱ्यांच्या निदर्शनास आले होते. त्यानंतर ते बेंच कापून येथीलच एका ग्रामपंचायत सदस्याच्या घराच्या छताला लावलेले आढळून आले. काही गावकऱ्यांनी त्यांचे फोटो काढून ग्रामपंचायतीकडे तक्रार दिली. त्यामध्ये ग्रापं सदस्य रोशनी मालधुरे यांनी ते बेंच कापून घराच्या छताला लावल्याचे नमूद आहे. तक्रारीत संदीप नाथेसह पुंडलिक वाढोकर, अंकुश हागोने, शुभम भुसारी, दिनेश लहाने यांची स्वाक्षरी आहे. ती तक्रार ग्रामपंचायतीला प्राप्त होताच ग्रामविकास अधिकारी बाळासाहेब ठोकणे यांनी त्याची प्रत सोबत जोडून पथ्रोट पोलिसांना ग्रामपंचायततर्फे पाठविण्यात आली. त्यावरून गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
ते बेंच चोरी प्रकरणात सदस्याचे नाव समोर आल्यामुळे गावात एकच खळबळ उडाली. शिंदी गावात हा प्रकार प्रथमच ऐकावयास मिळत असून, त्या बेंचचे कॉस्टिक मटेरियलचे पाय भंगारात विकल्याचेही समोर आले आहे. त्या भंगारवाल्याने ही बाब कबूल केली असून बेंचचे पाय ज्यांच्याकडून घेतले त्याला परत केल्याचे म्हटल्याचे ग्रामविकास अधिकारी ठोकणे यांनी सांगितले.
हा प्रकार गंभीर व लाजिरवाणा
आमदार निधीतून गावाला मिळालेले सार्वजनिक बेंच चोरीला जाणे, हा प्रकार गंभीर आहे. हा प्रकार जर ग्रामपंचायत सदस्यांकडून घडला असेल तर तेवढ्याच लाजिरवाणाही आहे. त्यामुळे अशा गोष्टींचे कधीच समर्थन केले जाऊ शकत नाही, असे माजी पंचायत समिती उपसभापती राजेंद्र पवार यांनी सांगितले.