सोलर कुकरची रक्कम गहाळ!
By Admin | Updated: July 14, 2014 00:44 IST2014-07-14T00:44:04+5:302014-07-14T00:44:04+5:30
सौर ऊर्जेचा प्रसार व प्रचार करण्याच्या अनुषंगाने सामाजिक

सोलर कुकरची रक्कम गहाळ!
पाच लाख गेले कुठे : सामाजिक वनीकरणातील प्रकार
अमरावती : सौर ऊर्जेचा प्रसार व प्रचार करण्याच्या अनुषंगाने सामाजिक वनीकरणाचे तत्कालीन उपमहासंचालक दिलीप सिंह यांच्या कल्पकतेतून माफक दरात सोलर कुकर नागरिकांपर्यत पोहोचविण्याकरिता उपक्रम राबविला गेला. मात्र त्यांची बदली होताच सोलर कुकरची पाच लाख रुपयांची रक्कम गहाळ झाल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. ही रक्कम गेली कुठे? मागील दोन वर्षांपासून या रक्क मेचा पत्ता लागत नसल्याने वरिष्ठ अधिकारी सुद्धा चक्रावून गेले आहेत.
स्वयंपाकासाठी इंधनाचा वापर म्हणून मोठ्या प्रमाणात वृक्षतोड केली जात आहे. त्यामुळे नागरिकांनी जेवण तयार करण्यासाठी सोलर कुकरचा वापर करावा, याकरिता येथील सामाजिक वनीकरणाचे तत्कालीन उपमहासंचालक सिंह यांनी फिरत्या निधीतून सौर ऊर्जेवर चालणारे सोलर कुकर माफक दरात जनतेसाठी उपलब्ध करुन दिले होते. या उपक्रमाला शहरी भागासह ग्रामीण भागातही चांगला प्रतिसाद मिळाला. अनेकांनी सोलर कुकरचा जेवण तयार करण्यासाठी वापर केला. बाजारातील मूल्यापेक्षा सामाजिक वनीकरणाने प्रती कुकर २२०० ते २३०० रुपये दरात हे सोलर कुकर उपलब्ध करुन दिले. हे कुकर खरेदी करण्यासाठी सामाजिक वनीकरणाने फिरत्या निधीतून व्यवस्था केली होती. घराघरात सोलर कुकर पोहचणे आणि लाकडाचा इंधन म्हणून वापर कमी होणे हा या उपक्रमागील तिवारी यांचा शुद्ध हेतू होता. मात्र सोलर कुकर खरेदीसाठी फिरत्या निधीतून वापरण्यात आलेली पाच लाखांची रक्कम अद्यापर्यत जमा करण्यात आली नाही. दोन वर्षांचा कालावधी लोटला असताना ही पाच लाखांची रक्कम कुठे आहे? हे कोडेच ठरले आहे.
फिरत्या निधीतून सोलर कुकरसाठी काढण्यात आलेल्या पाच लाख रुपयांच्या रक्कमेचा हिशेब ठेवण्याची जबाबदारी निश्चित करण्यात आली आहे. मात्र या पाच लाख रुपयांच्या रक्कमेचा विषय आला की, दरवेळेस चालढकल केली जाते. परंतु सोलर कुकर विक्रीतून जमा झालेली रक्कम कोणाच्या खिशात जाते, हे शोधण्याचीदेखील तसदी घेतली जात नाही. त्यामुळे सामाजिक वनीकरण विभागाचा कारभार कसा सुरु आहे, सिद्ध होते. यापूर्वी सामाजिक वनीकरणचे उपसंचालक गंगाधर देपे यांनी हरियाली योजनेतून वनकुटीत नियमबाह्य कामे, डॉ.बाबासाहेब आंबेडकर शासकीय उद्यानात अपहार करुन या विभागाची लक्तरे वेशीवर टांगली. देपे यांच्या करनाम्याची चौकशी सुरु असताना सोलर कुकरच्या पाच लाख रुपयांचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. (प्रतिनिधी)
दोन कर्मचाऱ्यांमध्ये
'फ्री स्टाईल'
सोलर कुकरच्या पाच लाखांच्या निधीवरुन लिपिक आणि स्विय सहायक यांच्यात शुक्रवारी फ्री स्टाईल झाली. महिला व पुरुष कर्मचारी असलेल्या या दोन कर्मचाऱ्यांमध्ये झालेला वाद आणि त्यानंतर फ्रि स्टाईलच्या घटनेने सामाजिक वनीकरणात चर्चेला उधाण आले आहे. ‘ बघून घेतो, तू चोर आहेस, साहेबांची हुजरेगिरी बंद कर, तुझा हिशेब करते’ असा शब्दप्रयोग सुरु असताना येथे उपस्थित असलेल्या स्टेनो यांनी मध्यस्थी करीत हा वाद संपुष्टात आला.