विद्यापीठाच्या एमबीए विभागातून शैक्षणिक कागदपत्रे गहाळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2021 04:14 IST2021-03-23T04:14:16+5:302021-03-23T04:14:16+5:30
अमरावती : संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या एमबीए विभागातून विद्यार्थ्यांची शैक्षणिक कागदपत्रे गहाळ झाली आहे. काही विद्यार्थ्यांना प्रवेश नाकारला. निकालदेखील ...

विद्यापीठाच्या एमबीए विभागातून शैक्षणिक कागदपत्रे गहाळ
अमरावती : संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या एमबीए विभागातून विद्यार्थ्यांची शैक्षणिक कागदपत्रे गहाळ झाली आहे. काही विद्यार्थ्यांना प्रवेश नाकारला. निकालदेखील रोखण्यात आले. याबाबत निवेदन, तक्रार देऊनही प्रशासनाकडून कोणतीच कारवाई केली जात नाही. केवळ समिती गठित झाली आणि अहवाल अप्राप्त आहे, असे टिपिकल उत्तर दिले जाते, असा आरोप युवक काँग्रेसचे प्रदेश महासचिव सागर देशमुख यांनी सोमवारी पत्रपरिषदेतून केला आहे.
एमबीए विभागाचा कारभार ढासळल्यासंदर्भात कुलगुरू मुरलीधर चांदेकर, प्र-कुलगुरू राजेश जयपूरकर, कुलसचिव तुषार देशमुख, परीक्षा व मूल्यांकन मंडळाचे संचालक हेमंत देशमुख यांना युवक काँग्रेसने शिष्टमंडळाच्या माध्यमातून पुराव्यानिशी सांगितले आहे. मात्र, दोषी अधिकारी, कर्मचाऱ्यांना वाचविण्यासाठी केवळ वरिष्ठ कर्तव्य बजावत असल्याचा आक्षेप युवक काँग्रेसने घेतला आहे. एमबीए विभागातून सन २०१८-२०१९ मध्ये प्रवेशित १० विद्यार्थ्यांचे मूळ शैक्षणिक कागदपत्रे गहाळ झाले आहेत. यात ४ विद्यार्थ्यांचे पदविका गुणपत्रिका, ५ विद्यार्थ्यांचे जातवैधता प्रमाणपत्र आणि एका विद्यार्थ्यांचा जात प्रमाणपत्राचा समावेश आहे. असे असताना मूळ कागदपत्रे न देता ९ विद्यार्थ्यांना दुय्यम कागदपत्रे देण्याचा प्रताप विद्यापीठाने केला आहे. याप्रकरणी दोषींवर नियमानुसार कारवाई करावी, अशी मागणी सातत्याने सुरू असताना केवळ समिती गठित असून, अहवाल अप्राप्त असल्याची सांगण्यात येते. ४ विद्यार्थ्यांचे निकाल रोखून ठेवले आहे. एमबीए विभागप्रमुखांचे प्रवेश, निकालाकडे लक्ष नाही. परीक्षांमध्ये सावळागोंधळ सुरु आहे. एमबीए विभागप्रमुख दीपक चाचरकर हे विद्यार्थ्यांना तक्रार मागे घेण्यासाठी दबावतंत्र आणतात, असा आरोप सागर देशमुख यांनी केला. कोरोना काळात परीक्षा घेण्यात आल्या असताना एमबीए विद्यार्थ्यांचे गुणपत्रिका रोखण्यात आल्या आहेत. पत्रपरिषदेत ऋषिकेश वासनकर, हेमा शर्मा, सुमित गणोरकर, केतकी पाटील आदी उपस्थित होते.
---------
आधी प्रवेश दिला नंतर रद्द केला
सन २०१९-२०२० या वर्षात एमबीए विभागाने हेमा शरद शर्मा या विद्यार्थिनीला समितीने प्रवेश दिला आणि नंतर प्रवेश नाकारला गेला. बी.कॉम अंतिम वर्षाचा निकाल जाहीर व्हायचा होता. त्यामुळे समितीने गुणपत्रिका आणून देईन, असे हेमा शर्मा हिच्याकडून लिहून घेतले. त्यानुसार शर्मा यांनी निकाल लागताच गुणपत्रिका आणून दिली. एमबीए भाग १ चा निकाल जाहीर झाल्यानंतर दुसऱ्या वर्षात प्रवेश दिल्याचे तिला सांगण्यात आले. मात्र, अचानक शर्मा यांना घरी पत्र पाठवून प्रवेश रद्द झाल्याचे कळविण्यात आले. याबाबत चौकशी समिती गठित करून पाच दिवसांत न्याय मिळेल, असे कुलगुरूंनी सांगितले. मात्र, दोन महिन्यांचा कालावधी लोटला तरी कारवाई झालीच नाही, असा आरोप युवक काँग्रेसने केला आहे.
------------------
एमबीए विभागाच्या कारभाराबाबत गठित समितीचे एक सदस्य कोरोनाग्रस्त आहे. त्यामुळे अहवाल अप्राप्त असून, समितीची एक बैठक व्हायची आहे. अहवाल मिळाल्यानंतर कार्यवाहीची रुपरेषा निश्चित होईल.
- तुषार देशमुख, कुलसचिव, अमरावती विद्यापीठ