गौण खनिज चोरीचा नवा फंडा : रॉयल्टी पासवर जादुई पेनचा वापर, आग दाखवताच अक्षरे गायब

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 18, 2021 04:57 PM2021-10-18T16:57:48+5:302021-10-18T17:19:23+5:30

बाजारात मिळणारा शंभर रुपये किमतीचा हा ‘टच अँड गो’ असा विशिष्ट पेन लाखो रुपयांची गौण खनिज चोरी करण्यास उपयुक्त ठरला आहे. महसूलसह शासनाच्या डोळ्यांत शुद्ध धूळफेक करीत गौण खनिज तस्करांकडून खेळ सुरू आहे.

minor mineral transport fraud in royalty pass by using special kind of pen | गौण खनिज चोरीचा नवा फंडा : रॉयल्टी पासवर जादुई पेनचा वापर, आग दाखवताच अक्षरे गायब

गौण खनिज चोरीचा नवा फंडा : रॉयल्टी पासवर जादुई पेनचा वापर, आग दाखवताच अक्षरे गायब

googlenewsNext
ठळक मुद्देशंभर रुपयांचा पेन, लाखोंची चोरी

नरेंद्र जावरे

अमरावती : मेळघाटातील डोंगर व सपाटीकरणाच्या नावावर शेतजमीन पोखरणारे काही स्टोन क्रशर संचालक, गौण खनिजाची रॉयल्टी काढणारे कंत्राटदार गौण खनिज चोरीसाठी अजब फंडा वापरत असल्याचे पुढे आले आहे. रॉयल्टी पासवर ‘टच अंड गो’ या जादुई पेनने लिहिलेली अक्षरे आगीच्या निकट येताच गायब होतात. यानंतर पुन्हा दुसरी वेळ टाकून दिवसभर खदानीतून गौण खनिज चोरी केली जात असल्याचा गोरखाधंदा महसूल विभागाच्या डोळ्यांमध्ये धूळ फेकणारा ठरला आहे.

महसूल विभागाच्या काही भ्रष्ट अधिकाऱ्यांच्या हेतुपुरस्पर दुर्लक्षामुळे मेळघाटातील डोंगर पोखरले जात आहेत. शासनाला महसूल मिळण्याचा महत्त्वपूर्ण उद्देश असला तरी चोरी करण्यासाठी दिली जाणारी रॉयल्टीची मुदत भुवया उंचावणारी आहे. एकप्रकारे ही मुभा असल्याची चर्चा आहे. हाताखालील पथकाने चोरून जाणाऱ्या गौण खनिजाचे ट्रक पकडल्यानंतर वरिष्ठांकडून अनेकदा कुठलीच कारवाई न करता ते सोडले जात असल्याची चर्चा आहे. ही कृती गौण खनिज तस्करांचे मनोबल वाढवणारी व हाताखालील कर्मचाऱ्यांचे मनोधैर्य खचविणारी ठरली आहे.

स्टोन क्रशर आणि शेत सपाटीकरणासाठी जेसीबी, पोकलेन शासनाच्या कोणत्या नियमानुसार वापरले जात आहे, याचा खुलासा अजूनही महसूल विभागाने केलेला नाही, किंवा खदानीवर उभी असलेली यंत्रसामग्री जप्त करण्याची तसदीसुद्धा घेतली नाही. ज्यांच्यावर गौण खनिज चोरीला आळा घालण्याची व चोरट्यांना शासन करण्याची जबाबदारी आहे तेच मुके, आंधळे आणि बहिरे झाले का, असे म्हणायची वेळ आली आहे

शंभर रुपयांचा पेन, लाखोंची चोरी

गौण खनिज आणण्यासाठी दिल्या जाणाऱ्या रॉयल्टी पासवर वाहन क्रमांक, वेळ, दिनांक आदी माहिती टाकण्यासाठी विशिष्ट पेनचा उपयोग काही स्टोन क्रशर संचालक रॉयल्टी काढणारे इतर कंत्राटदार करीत असल्याची खात्रीलायक सूत्रांची माहिती आहे. जीपीएस प्रणालीचा उपयोग असला तरी गौण खनिज तस्करांनी त्यावर उपाय शोधला आहे. बाजारात शंभर रुपये किमतीचा हा ‘टच अँड गो’ असा विशिष्ट पेन लाखो रुपयांची गौण खनिज चोरी करण्यास उपयुक्त ठरला आहे. महसूलसह शासनाच्या डोळ्यांत शुद्ध धूळफेक करीत गौण खनिज तस्करांकडून खेळ सुरू आहे.

आग दाखवताच अक्षर गायब

रॉयल्टी पासवर संबंधित वाहनांची माहिती भरली जाते. दिवसभर एकाच रॉयल्टी पासवर दोन ब्रास गौण खनिजाची परवानगी असताना तीन ते चार ब्रासची चोरी एकाच इन्व्हाईस नंबरवर केली जाते. रॉयल्टी पासवर केवळ वेळ किंवा वेळ पडल्यास ट्रक नादुरुस्त झाल्याचे दाखवून क्रमांक बदलवून गौण खनिजाची चोरी बिनबोभाट केली जाते.

संबंधित रॉयल्टी पास संदर्भातील ॲप केवळ महसूल अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या मोबाईलमध्ये आहे. पोलीस, आरटीओ किंवा इतर विभागांना हा प्रकार लक्षात येतच नाही. यातील इन्व्हाईस नंबर किती वाजताचा आहे, हे केवळ ॲपवर दिसते. विशिष्ट पेनने रॉयल्टी पासवर लिहिल्यानंतर त्याच्याखाली आगकाडी किंवा लायटरने दुरून आग दाखविताच पूर्वी लिहिलेली अक्षर गायब होतात व पुन्हा नव्याने वाहन क्रमांक किंवा वेळ लिहिली जाते, हे विशेष.

Web Title: minor mineral transport fraud in royalty pass by using special kind of pen

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.