गौण खनिज रॉयल्टीत दुपटीने वाढ
By Admin | Updated: June 30, 2015 00:27 IST2015-06-30T00:27:06+5:302015-06-30T00:27:06+5:30
गौण खनिजाच्या रॉयल्टी (स्वामित्वधन) दरांमध्ये शासनाने दुपटीने वाढ केली आहे.

गौण खनिज रॉयल्टीत दुपटीने वाढ
नवा बदल : दर तीन वर्षांनी दरात होणार सुधारणा
अमरावती : गौण खनिजाच्या रॉयल्टी (स्वामित्वधन) दरांमध्ये शासनाने दुपटीने वाढ केली आहे. या दरात दर तीन वर्षांनी सुधारणा होणार आहे. या दरवाढीमुळे वीट, दगड, मुरुम माती महागणार असल्याने बांधकामांच्या खर्चातही वाढ होणार आहे. व्यवासायातील वापरण्यात येणाऱ्या माती दगड, चुना या गौण खनिजांची रॉयल्टी न भरल्यास संबंधितांवर तीन पट दंड आकारण्यात येणार आहे.
रस्ते इमारती व घरे आदींच्या बांधकामासाठी तसेच मातीची भांडी, काच सामान व विविध प्रकारच्या सजावटीसाठी दगड, माती, मुरुम या गौण खनिजाचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. खासगी वा शासकीय जमिनीवरील गौण खनिजांचे उत्खनन करुन जे विक्रीसाठी वापरले गेले शासनाच्यावतीने त्याची रॉयल्टी स्वामित्वधन वसूल करण्यात येते. या गौण खनिजाच्या रॉयल्टीमधून शासनाच्या तिजोरीत दरवर्षी कोट्यवधी रुपयांचा महसूल जमा होतो.
आता या दरांमध्ये वाढ करण्यात आल्याने शासनाच्या महसुलातही त्याचप्रमाणात वाढ होणार आहे. गौण खनिजांच्या रॉयल्टी दरात वाढ करताना त्यातून तस्करीमुळे गाजत असलेली वाळू मात्र वगळण्यात आली आहे. शासनाने पाच वर्षांनंतर गौण खनिजाच्या रॉयल्टीमध्ये दुपटीने वाढ केली आहे. बांधकामासाठी वापरण्यात येणारा चुना तयार करण्यासाठी चुनखडी व शिंपल्यापासून केलेल्या चुन्याचा प्रति ब्रास २०० रुपये दर होता. आता तो ४०० रुपये करण्यात आला आहे. दगडासाठी प्रतिब्रास पूर्वी २०० रुपये रॉयल्टी आकारली जात होती. यामध्ये दुपटीने वाढ केल्यानंतर आता ४०० रुपये रॉयल्टी आकरण्यात येणार आहे. बांधकामासाठी वापरण्यात येणारा जामा दगडासाठी आत प्रति ब्रास १०० रुपये भरावे लागणार आहे. उत्खनाद्वारे काढलेले किंवा गोळा केलेले दगड बारीक खडी, मुरुम व डमर दगडासाठीदेखील आता ४०० रुपये रॉयल्टी आकारण्यात येणार आहे. त्यापूर्वी त्यासाठी प्रतीब्रास २०० रुपये आकारण्यात येत होते. घरांची कवेलू तयार करण्यासाठी साधी चिकनमाती आवश्यक असते. यापूर्वी या मातीसाठी २०० रुपये प्रतिब्रास रॉयल्टी आकारली जात होती. यामध्ये २०० रुपये वाढ झाल्याने आता कवेलू तयार करणाऱ्या व्यावसायिकांना प्रतीब्रास ४०० रुपये मोजावे लागणार आहेत. अंतर्गत बंधारे, रस्ते, लोहमार्ग व इमारती यांची बांधकामे करताना तसेच भरणा करण्यासाठी हा भूभाग सपाट करण्यासाठी वापरण्यात येणारी साधी माती तसेच पाटीचा दगड किंवा नरम खडक यांच्या दरातदेखील दुपटीने वाढ झाली आहे.
यावर्षीपासून यासाठी ४०० रुपये प्रतीब्रास आकारण्यात येणार आहे. फुलरची माती किंवा भपाईसाठी आता १ हजार २४ रुपये मोजावे लागणार आहेत. सजावटीच्या प्रयोजनासाठी वापरण्यात येणाऱ्या सर्व दगडासाठी (ग्रेनाईट वगळून) आता प्रतिब्रास १ हजार ९२० रुपये रॉयल्टी भरावी लागेल. विटा तयार करण्यासाठी लागणारी साधी माती गाळ सर्व प्रकारची चिकन माती यासाठी प्रति ब्रास १६० रुपये भरावे लागणार आहे.
-तर अशा मातीवर रॉयल्टी नाही
जमिनीच्या एखाद्या भूखंडाचा विकास करताना मातीचे उत्खनन करुन जी माती त्या भूखंडाच्या सपाटीकरणाकरिता वापरली गेल्यास किंवा ती अशा भूखंडाच्या विकासाच्या प्रक्रियेतील कोणत्याही कामासाठी वापरल्यास अशा मातीवर रॉयल्टी आकारली जाणार नसल्याचे शासनाने नमूद केले आहे. सर्व गौण खनिजांसाठी (ग्रेनाईड वगळून)प्रती हेक्टर किंवा त्यांच्या भागासाठी ६ हजार रुपये ठोकबंद भाडे राहणार आहे.