कृषीमंत्र्यांनी पदाचा राजीनामा द्यावा
By Admin | Updated: July 27, 2016 23:57 IST2016-07-27T23:57:35+5:302016-07-27T23:57:35+5:30
विभागातील शेतकऱ्यांच्या नुकसानीबाबत मांडलेल्या लक्ष्यवेधीवर उत्तर देताना कृषी राज्यमंत्री सदाशिव खोत यांनी दाखविलेल्या प्रचंड अनास्थेमुळे संतप्त होऊन ....

कृषीमंत्र्यांनी पदाचा राजीनामा द्यावा
यशोमती ठाकूर आक्रमक : शेतकऱ्यांच्या प्रश्नांबाबत दाखविली अनास्था
अमरावती : विभागातील शेतकऱ्यांच्या नुकसानीबाबत मांडलेल्या लक्ष्यवेधीवर उत्तर देताना कृषी राज्यमंत्री सदाशिव खोत यांनी दाखविलेल्या प्रचंड अनास्थेमुळे संतप्त होऊन आ. यशोमती ठाकून यांनी कृषीमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी केली.
पावसाळी अधिवेशनात आ. यशोमती ठाकूर यांनी अमरावती जिल्ह्यातच नव्हे तर अमरावती विभागात पेरणीच्या वेळी बियाण्यांचा प्रचंड तुटवडा निर्माण झाल्याचा मुद्दा मांडला. मात्र, याबाबत उत्तर देताना कृषीमंत्री उदासिन होते. त्यांनी केवळ याबाबत माहिती मागविण्यात येईल, असे त्रोटक उत्तर दिले. यामुळे आ. यशोमती आक्रमक झाल्यात. शेतकऱ्यांच्या जीवन-मरणाचा इतका गंभीर विषय मांडला जात असताना कृषीमंत्री अशी टोलवाटोलवीची उत्तरे कशी काय देऊ शकतात? असा संतप्त सवाल यशोमतींनी केला. आजवर शेतकरी हितासाठी आंदोलने करणारे आणि आपणच शेतकऱ्यांचे खरे तारणहार असल्याचे चित्र निर्माण करणारे सदाशिव खोत आता कृषीमंत्री पदी आरूढ आहेत. परंतु तरीही त्यांना शेतकऱ्यांच्या समस्यांबाबत कणव नाही. ‘अच्छे दिन’चा गाजावाजा करणाऱ्या या बेजबाबदार मंत्र्यांना शेतकरी मरणासन्न अवस्थेत असताना पदावर राहण्याचा नैतिक अधिकार नाही. त्यामुळे खोत यांनी तातडीने राजीनामा द्यावा, अशी मागणी आ. यशोमतींनी केली.
जिल्ह्यात पेरणीच्या वेळी नगदी पीक म्हणून ओळखले जाणारे सोयाबीन व इतर पिकांच्या बियाण्यांचा तुटवडा निर्माण झाला होता. पेरणी आटोपल्यानंतर शासनाने सोयाबीन ऐवजी कपाशी बियाण्यांचे मोफत वाटप सुरू केले. परंतु पेरणी आटोपल्यानंतर या बियाण्यांकडे शेतकऱ्यांनी पाठ फिरविली. जिल्ह्यात कोरी बियाणे कंपनीकडून ५० हजार पाकिट वाटपाचे उद्दिष्ट्य असताना चार तालुक्यांतील केवळ १८१८ शेतकऱ्यांनी पाकिटांची उचल केली. त्यामुळे हा सर्व प्रकार खासगी बियाणे कंपनीच्या हितासाठी असल्याची घणाघाती टीका देखील आ. यशोमती ठाकूर यांनी सभागृहात केली. आधीच शेतकरी सर्व बाजूंनी अडचणीत असताना शासनाकडून कोणत्याही प्रकारे दिलासा देण्याचे प्रयत्न होेत नाहीत. शासन केवळ घोषणाबाजी करीत असल्याचा मुद्दा त्यांनी सभागृहात आक्रमकपणे मांडला. शेतकऱ्यांनी कपाशी बियाण्यांकडे पाठ फिरविली. सोयाबीन बियाण्यांना पसंती दिल्याने पडून असलेले कपाशीचे बियाणे शेतकऱ्यांच्या माथी मारण्यात आले. कृषी विभाग शेतकऱ्यांऐवजी कंपन्यांच्या हितासाठी काम करीत असल्याचा आरोेपही आ. यशोमतींनी सभागृहात केला.
(प्रतिनिधी)