अल्पभूधारक शेतकऱ्यांना दुप्पट वीज देयक !
By Admin | Updated: January 8, 2017 00:19 IST2017-01-08T00:19:42+5:302017-01-08T00:19:42+5:30
अत्यल्पभूधारक उपसा पंपधारक शेतकऱ्यांना वीजदरात सवलत देण्याची मागणी होत आहे.

अल्पभूधारक शेतकऱ्यांना दुप्पट वीज देयक !
नवे संकट : महावितरणचा ऐन थंडीत शॉक
रोशन कडू तिवसा
अत्यल्पभूधारक उपसा पंपधारक शेतकऱ्यांना वीजदरात सवलत देण्याची मागणी होत आहे. ती अव्हेरून या शेतकऱ्यांना दामदुप्पट दराने वीज बिल देण्यात आलेली आहे. यामुळे आधीच आर्थिक संकटात असलेला शेतकरी त्रस्त झाला आहे.
शेतीसाठी विजेचा दर सातत्याने चर्चेत राहिला आहे. आता तर मागील महिन्यात कृषी उपसा पंपाची वीजबिले दुप्पटीने आली आहेत. त्यामुळे शेतकरी मोठ्या प्रमाणावर आर्थिक संकटात सापडला आहे. मध्यंतरीच्या काळात वीज नियामक मंडळाने ९ हजार कोटींच्या वीज दरवाढीस मंजुरी दिली. याचा सर्वाधिक फटका कृषी उपसा वीजपंप धारकांना बसला आहे.
विद्युत नियामक आयोगाच्या मंजुरीनंतर नोव्हेंबर महिन्यापासून सुधारित दरवाढ लागू करण्यात आली. ही वाढीव दराची बिले आता शेतकऱ्यांना देण्यात आली आहे. वीज बिलामधील काही रक्कम शासन शेतकऱ्यांना अनुदान स्वरुपात देते. ही अनुदानाची रक्कम वजा जाता दुप्पट दरवाढीचा बोजा मात्र कायम राहत आहे. शासनाने ही वीज दरवाढ करताना पूर्ण दाबाचे वीजपुरवठा करावा, ही शेतकऱ्यांची मागणी दुर्लक्षित राहिली आहे. यामुळे शेतकऱ्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. विद्युत भारनियमन व कमी भारातील विजेच्या खेळखंडोबामुळे रबीचे सिंचन कसे करावे, असा प्रश्न शेतकऱ्यांना भेडसावत आहे. त्यातच दामदुप्पट दरातील वीज बिलांमुळेही शेतकरी अडचणीत सापडले आहे.
शेतीचे वीज युनिट ३.३२ रुपयांच्या घरात
यापूर्वीच्या सरकारच्या काळात शेतीपंपासाठी वीज नियामक मंडळाने प्रतियुनिट दोन रुपये ८८ पैसे दर निश्चित केला होता. त्याला विरोध झाल्यानंतर या दरामधील ७२ पैसे शेतकऱ्यांनी भरायचे उर्वरित २.१६ पैसे शासनाने अनुदान स्वरुपात देण्याचा निर्णय झाला होता. सन २०१४-१५ पर्यंत हे प्रमाण २५ ते ४४ टक्के या प्रमाणात होते. मात्र, १ जून २०१५ पासून राज्य शासनाने २.८८ या दरात ४४ टक्के वाढ करण्याचा निर्णय घेतला. या वाढीनुसार शेतीची वीज ३.३२ रुपयांपर्यंत पोहोचली आहे.