वृक्षसंगोपनाचा लाखोंचा खर्च व्यर्थ
By Admin | Updated: March 16, 2016 08:29 IST2016-03-16T08:29:44+5:302016-03-16T08:29:44+5:30
बिहार पॅटर्न अंतर्गत तालुक्यात अनेक रस्त्यांवर मागील तीन वर्षांत हजारो वृक्षांची लागवड करण्यात आली.

वृक्षसंगोपनाचा लाखोंचा खर्च व्यर्थ
सामाजिक वनीकरण विभागाचे दुर्लक्ष : पाण्याअभावी सुकू लागली झाडे
सुमित हरकूट चांदूरबाजार
बिहार पॅटर्न अंतर्गत तालुक्यात अनेक रस्त्यांवर मागील तीन वर्षांत हजारो वृक्षांची लागवड करण्यात आली. वृक्षांच्या संगोपनासाठी महिन्याकाठी लाखो रुपये खर्च होतात. उन्हाळ्यात झाडे जिवंत रहावी यासाठी टँकरने पाणी पुरविण्याची व्यवस्थाही करण्यात आली आहे. परंतु मार्चच्या मध्यान्हावरही या झाडांची आळे कोरडी पडली असून झाडे शेवटच्या घटका मोजत आहेत.
तालुक्यात सामाजिक वनीकरण विभागांतर्गत एकूण १९ रस्त्यांवर दुतर्फा झाडे लावली आहे. हे कार्यक्रम तीन वर्षांपासून राबविण्यात येत आहे. या वृक्षांच्या संगोपनासाठी दररोज १५५ ते १६० मजूर काम करतात. यांना दररोज १८१ रुपये प्रतिव्यक्ती मजुरी दिली जाते. यावर २८ हजार रुपये दररोज खर्च केला जातो. याप्रमाणे दर महिन्याला अंदाजे ८ लाख ४२ हजार रुपये मजुरीवर खर्च होतो. एका झाडावर वर्षाकाठी सरासरी एक हजार रुपये संगोपन खर्च होतो, अशी माहिती सामाजिक वनीकरण कार्यालयातर्फे देण्यात आली.
आजघडीला तालुक्यातील १९ रस्त्यांवर ३० हजार ६२५ वृक्षांची लागवड करण्यात आली आहे. या वृक्षांचा संगोपनात वृक्ष संरक्षणासोबत उन्हाळ्यात पाणी देऊन वृक्ष वाचविण्याची तरतूद करण्यात आली आहे. यासाठी प्रत्येक साईडवर वृक्षांना पाणी देण्याकरिता टँकरने पाणी पुरविण्यात येत असे. सध्या वृक्षांना पाणी देण्याकरिता टँकर सुरू असल्याची माहिती संबंधित अधिकाऱ्यांकडून मिळाली. परंतु त्याच दिवशी प्रत्यक्ष पाहणी केली असता वृक्षांची सर्व आळे कोरडीठण्ण आढळून आली. तसेच पाण्याअभावी वृक्षांची सर्व पाने गळून पडलेली दिसून आली. पाण्याअभावी मरणासन्न अवस्थेत पोहोचलेली ही झाडे पाण्यासाठी लाखो रूपये खर्च करूनही जिवंत राहतील काय, यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.