लाखोंचे मानधन मिळते तरी कुणाला ?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2016 01:08 IST2016-12-30T01:08:52+5:302016-12-30T01:08:52+5:30
महापालिकेला कंत्राटी सेवा पुरविणाऱ्या एजन्सीच्या मनुष्यबळाचे इन्स्पेक्शन केल्यास महापालिकेची अर्थिक लूट थांबू

लाखोंचे मानधन मिळते तरी कुणाला ?
प्रदीप भाकरे ल्ल अमरावती
महापालिकेला कंत्राटी सेवा पुरविणाऱ्या एजन्सीच्या मनुष्यबळाचे इन्स्पेक्शन केल्यास महापालिकेची अर्थिक लूट थांबू शकते. अनेक कामगार केवळ कागदावर असून त्या मोबदल्यात महापालिका मात्र संबंधित कंत्राटदार एजन्सीला महिन्याकाठी लाखो रुपयांचे मानधन अदा करते.
महापालिकेने सुरक्षा रक्षकांसह स्वास्थ्य निरीक्षक, वाहनचालक, संगणक चालक, मजूर, बागवान आदी कंत्राटीतत्वावर घेतले आहेत. मात्र, दिवसेंदिवस कंत्राटींचा हा आकडा फुगत असून त्यावर कुणाचेही नियंत्रण उरलेले नाही. कंत्राटी तत्वावर काम करणाऱ्या कामगारांच्या मानधनाची फाईल जीएडीकडून चालविली जाते. मात्र, प्रत्यक्षात देयकासोबत जोडलेल्या कामगारांची हजेरी तपासल्या जात नाही. कंत्राटदार जोडेल किंवा दाखवेल तिच पूर्वदिशा, हाच जीएडीचा खाक्या राहिला आहे. तत्कालीन आयुक्त चंद्रकांत गुडेवार यांनी याकंत्राटी कामगारांची स्थळनिहाय तपासणी केली होती. आता नव्याने ती गरज भासू लागली आहे. जेथे गरजच नाही तेथे वाजवीपेक्षा अधिक सुरक्षा रक्षक दाखविण्यात आले आहेत. जकातनाक्यावर दाखविलेले ७ सुरक्षा रक्षक नेमकी कुणाची सुरक्षा करतात, हा प्रश्न अनुत्तरीत आहे.
परकोट परिसरातील सुरक्षा रक्षक बेपत्ता
जवाहर गेट ते गांधी चौक परिसरातील परकोटाजवळ तीन सुरक्षा रक्षक असल्याचा दावा ‘अमृत’ संस्थेकडून केला जातो. प्रत्यक्षात गुरुवारी सकाळी ६ ते २ आणि दुपारी २ ते रात्री १० या कालावधीत एकही सुरक्षा रक्षक आढळून आला नाही. प्रत्यक्षात परकोटाजवळ ‘डगवार’ या खासगी सुरक्षा यंत्रणेचे दोन गार्ड आढळून आलेत. आम्ही तिघे असतो. मात्र, आमचा ‘अमृत’ किंवा महापालिकेशी कुठलाही संबंध नसल्याचे त्या सुरक्षा रक्षकांनी स्पष्ट केले.
विनागणवेश सुरक्षा रक्षक
श्रीकृष्णपेठेतील महापालिकेच्या उद्यानात दोन्ही सुरक्षा रक्षक ‘शिपाई’ म्हणून आढळून आले. सुरक्षारक्षक म्हणून त्यांना ओळखपत्राशिवाय अन्य कुठलीही सुविधा देण्यात आली नाही. अनेक ठिकाणी ‘अमृत’चे सुरक्षा रक्षक ‘शिपाई’ म्हणून काम करीत आहेत. त्यांना गणवेश,काठी,शिटी देखील देण्यात आलेली नाही. प्रशासनाच्या नाकावर टिच्चून ‘अमृत’चा गोरखधंदा सुरु आहे. गणवेश, काठी, शूज पुरविणे अनिवार्य असल्याची अट करारनाम्यात आहे. मात्र, या अटीचे वारंवार उल्लंघन होत असताना प्रशासनाने अर्थपूर्ण मौन धारण केले.
फ्रेजरपुरा स्मशानभूमीत एक सुरक्षा रक्षक
फ्रेजरपुरा स्मशानभूमीत दुपारी २ ते रात्री १० या कालावधीसाठी दोन सुरक्षा रक्षक दाखविण्यात आले आहेत. प्रत्यक्षात गुरुवारी दुपारी ३.३० वाजता येथे भेट दिली असता एकच सुरक्षा रक्षक आढळून आला.
असे आहेत कंत्राटी कर्मचारी
४सुरक्षा रक्षक : १५७, १ मिस्त्री, २ वेल्डर, ६० मजूर, २ सहायक अधीक्षक
४स्वास्थ्य निरीक्षक : २१, ३० वाहन चालक, ४ सर्वेअर
४बागवान : ०८, ४ लिपिक, १ सुतार, ३ उपलेखाधिकारी.