लाखोंची गावठी दारू नष्ट

By Admin | Updated: June 24, 2015 00:39 IST2015-06-24T00:39:13+5:302015-06-24T00:39:13+5:30

मुंबई येथील मालवण भागात गावठी दारू पिल्याने ९० च्यावर नागरिकांचा मृत्यू झाला.

Millions of liquor waste destroyed | लाखोंची गावठी दारू नष्ट

लाखोंची गावठी दारू नष्ट

पोलिसांचे धाडसत्र : अवैध दारू विक्रेत्यांवर कारवाईचा बडगा
अमरावती : मुंबई येथील मालवण भागात गावठी दारू पिल्याने ९० च्यावर नागरिकांचा मृत्यू झाला. त्या अनुषंगाने अमरावती जिल्ह्यातील अवैध दारू विक्रेत्यांवर कारवाईची मोहीम सुरु करण्यात आली आहे. मागील काही दिवसांतच जिल्ह्यातील शेकडो व्यावसायिकांवर कारवाई करून पोलिसांनी लाखो रुपयांचा अवैध दारूचा साठा नष्ट केला. जिल्ह्याभरातील विविध पोलीस ठाण्यांच्या हद्दीतील अवैध दारूविक्रेत्यांवर कारवाईचे सत्र सुरुच आहे.
पोलीस आयुक्त राजकुमार व्हटकर व जिल्हा ग्रामीण अधीक्षक लखमी गौतम यांच्या मार्गदर्शनात जिल्ह्यातील विविध ठिकाणच्या अवैध दारू व्यवसायावर धाडी टाकण्यात येत आहेत. दररोज प्रत्येक पोलीस ठाण्यांच्या हद्दीत चार ते पाच कारवाई करण्यात येत आहेत. ग्रामीण भागात तीन दिवसांत १२७ अवैध दारूच्या अड्ड्यांवर धाडी टाकून पोलिसांनी एक लाखांच्यावर दारू नष्ट केली आहे. शहरी भागातील विविध पोलीस ठाण्यांतर्गत १०० च्याजवळपास अवैध दारू विक्रेत्यांवर कारवाई करण्यात आली आहे. पोलीस आयुक्तालय हद्दीतील फे्रजरपुरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत सर्वाधिक कारवाया करण्यात आल्या आहेत. पोलीस उपायुक्त सोमनाथ घार्गे यांच्या नेतृत्वात फे्रजरपुरा पोलिसांनी सोमवारी आठ ठिकाणी धाडी टाकून तब्बल ४५ हजारांची दारू जप्त करून नष्ट केली आहे. तसेच गाडगेनगर, राजापेठ, भातकुली, वलगाव, नांदगाव पेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीतही कारवाया करून लाखों रुपयांचा दारूचा साठा नष्ट करण्यात आला आहे. त्याचप्रकारे ग्रामीण भागातही दारू अड्ड्यांवर धाड टाकून पोलिसांनी १२७ कारवाया केल्यात. शहरी भागात गुन्हे शाखेकडून अवैध दारू अड्ड्यांवर कारवाई करण्यात आली आहे. मंगळवारी सकाळी राजुरा येथील रहिवासी अपेश राजू पवार (२२) याच्या घरी धाड टाकून पोलिसांनी १०० लिटर गावठी दारूचा सडवा नष्ट केला. गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रियाजुद्दीन देशमुख यांच्या मार्गदर्शनात एपीआय गोपाल उपाध्याय, एपीआय अतुल वर, रवी राठोड, पोलीस उपनिरीक्षक नितीन थोरात यांनी ही कारवाई केली.

पोलिसांना आता सुचले शहाणपण
मुंबई येथील मालवंड भागात गावठी दारूमुळे मृत्यूचे तांडव घडले. अमरावतीत असे प्रकार घडू नयेत याकरिता जिल्हा पोलीस प्रशासन गंभर्याने आता दखल घेत आहेत. दररोज अवैध व गावठी दारू विक्रेत्यांवर कारवाई करण्यात येत आहे. आजपर्यंत इतक्या मोठ्या प्रमाणात जिल्ह्यात अवैध दारू विक्रेत्यांवर कारवाई करण्यात आली नव्हती. मात्र, आता सुरु असलेल्या कारवायांमुळे जिल्ह्यात अवैध दारूचा महापूरच असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे पोलिसांना उशिरा शहाणपण सुचले, असे दिसून येत आहे.

गावठी दारूत 'स्लो पॉयझन'
जिल्ह्यात आतापर्यंत सर्रास गावठी दारूची विक्री केली जात असल्याचे पोलिसांच्या कारवाईतून लक्षात येत आहे. गावठी दारूविक्रेता नशेचे प्रमाण वाढविण्यासाठी विविध प्रकारची रसायने दारूत मिश्रण करीत असल्याचे निदर्शनास आले आहे. नवसागरसारखे घातक रसायन गावठी दारूत मिसळले जात असल्याची माहिती तज्ज्ञांकडून मिळाली आहे. हे एकप्रकारे 'स्लो पॉयझन' असल्याचेही सांगण्यात येत आहे. त्यामुळे जिल्ह्यातील अनेक ठिकाणी गावठी दारूतून नागरिकांना 'स्लो पॉयझन दिले जात असल्याचे निदर्शनास येत आहे.

Web Title: Millions of liquor waste destroyed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.