स्थलांतरीत पक्ष्यांची पंढरी झाली प्लास्टिकमय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 20, 2016 00:21 IST2016-10-20T00:21:32+5:302016-10-20T00:21:32+5:30
छत्री तलाव ही पक्ष्यांची पंढरी म्हणून सर्वपरिचित आहे. नाना प्रकारच्या स्थानिक व स्थलांतरित पक्ष्यांची मांदियाळी याठिकाणी पाहायला मिळते.

स्थलांतरीत पक्ष्यांची पंढरी झाली प्लास्टिकमय
छत्री तलावात प्रदूषण : पर्यावरणाला धोका
वैभव बाबरेकर अमरावती
छत्री तलाव ही पक्ष्यांची पंढरी म्हणून सर्वपरिचित आहे. नाना प्रकारच्या स्थानिक व स्थलांतरित पक्ष्यांची मांदियाळी याठिकाणी पाहायला मिळते. मात्र, हे ठिकाण आता प्लास्टिकमय झाल्यामुळे पक्ष्यांसह पर्यावरणाला मोठा धोका निर्माण झाला आहे. तरीसुद्धा छत्री तलावातील प्रदुषणाकडे जिल्हा प्रशासन महापालिका प्रशासनही दुर्लक्ष करीत आहे.
शहरातील काही पक्षी अभ्यासक पक्षांच्या अधिवासाच्या सुरक्षेबाबत सतर्क आहेत. यामध्ये दिशा फाउंडेशनने केलेल्या अभ्यासात आजवर एकूण २१४ प्रकारच्या पक्ष्यांची नोंद छत्री तलाव परिसरात झाली आहे. विशेष म्हणजे यामध्ये एकूण ६४ प्रकारच्या स्थलांतरीत पक्ष्यांचा समावेश आहे. इतक्या मोठ्या प्रमाणात पक्ष्यांची संख्या ही जिल्ह्यातील समृद्ध जैवविविधतेचे प्रतिक आहे. याठिकाणी येणारे विदेशी पक्षी येथील खास वैशिष्ट्य आहे. पाणपक्षी व रानपक्षी असे दोन गट यामध्ये दिसून येतात. नोंद झालेल्या एकूण २१४ पक्ष्यांमध्ये ८५ प्रकारचे पाणपक्षी व १२९ प्रकारच्या रानपक्ष्यांचा समावेश आहे. म्हणजेच एकूण २१४ पक्ष्यांपैकी ४०% पक्ष्यांचा अधिवास हा छत्री तलाव या जलीय परिसंस्थेशी निगडित आहे. मात्र, आता छत्री तलावला घातक प्लास्टिकचा वेढा पडल्याने या पक्ष्यांचा अधिवासही धोक्यात आला आहे. तलावाचा मागच्या बाजूला प्लास्टिक द्रोण व प्लास्टिक पत्रावळींचा मोठा थर साचला आहे. त्यामुळे तलावातील पाणी प्रदूषित झाले आहे. विशेषत: तलावाच्या मागच्या काठावरील पाणथळ चिखलात अनेक पक्षी वास्तव्य करतात. सोनटिटवा, जलरंक, धोबी आदी पक्ष्यांची जीवनक्रियाच या चिखलाणीवर अवलंबून असते. चिखलाणीमधील कीटक व इतर जीव या पक्ष्यांचे मुख्य खाद्य असते. काठावर संपूर्ण प्लास्टिक साचल्यामुळे पक्ष्यांचे जीवन अडचणीत आले आहे. पक्षीमित्र व छायाचित्रकार यादव तरटे, वैभव दलाल, मनोज बिंड यांनी छत्री तलावाला प्रदूषणमुक्त करावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे.