स्थलांतरित पक्षी अचलपूरच्या गोंडविहीर तलावावर दाखल 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 11, 2020 08:43 PM2020-11-11T20:43:47+5:302020-11-11T20:45:32+5:30

Bird, Amravati News अचलपूर तालुक्यातील गोंडविहीर तलावावर स्थलांतरित पक्षी यायला सुरूवात झाली आहे. यात चक्रवाक (रूडी शेलडक) च्या आगमनाने पक्षिवैभवात भर पडली आहे.

Migratory birds arrive at Gondvihir Lake in Achalpur | स्थलांतरित पक्षी अचलपूरच्या गोंडविहीर तलावावर दाखल 

स्थलांतरित पक्षी अचलपूरच्या गोंडविहीर तलावावर दाखल 

googlenewsNext
ठळक मुद्देचक्रवाकच्या आगमनाने वैभवात भरआळशी कोकिळा चर्चेत

 

लोकमत न्यूज नेटवर्क

अमरावती : अचलपूर तालुक्यातील गोंडविहीर तलावावर स्थलांतरित पक्षी यायला सुरूवात झाली आहे. यात चक्रवाक (रूडी शेलडक) च्या आगमनाने पक्षिवैभवात भर पडली आहे.

पहिल्या पक्षी सप्ताहानिमित्त अमरावती प्रादेशिक वनविभागांतर्गत परतवाडा वनपरिक्षेत्रातील वनअधिकारी आणि वनकर्मचाऱ्यांनी पक्षी अभ्यासकांच्या उपस्थितीत सोमवार ९ नोव्हेंबरला गोंडविहीर तलावावर पक्षिनिरीक्षण केले. या पक्षिनिरीक्षणादरम्यान चक्रवाक बदक (रूडी शेलडक) सह कॉमन पोचार्ड (छोटी लालसरी/शेंद्र्या), इंडियन स्पॉट बिलडक (हळदीकुंकू बदक), रिव्हर टर्न बर्ड (नदीसूरय), राखी बगळा (ग्रे हेरॉन), जांभळा बगळा (परपल हेरॉन) सह २२ प्रजातींच्या पक्ष्यांची नोंद घेतल्या गेली.

स्टॅनडींग फॉर टायगर्स फाऊंडेशन पुणे (एसएफटीएफ) या संस्थेच्या सहकार्याने पार पडलेल्या या पक्षी निरीक्षणात वनपाल डी. सी. लोखंडे, वनरक्षक प्रशांत उमक, प्रवीण निर्मळ, नितीन अहिरराव, वनमजूर दिनेश किरसान, संदीप राऊत, शामराव भुसूम, नानू बेठे, एसएफटीएफचे सचिव अल्केश ठाकरे आणि कोषाध्यक्ष शिशीर शेंडोकार यांनी सहभाग नोंदविला. पक्षिनिरीक्षणात नोंदल्या गेलेल्या या पक्ष्यांची नोंद ई-बर्ड या जागतिक संकेतस्थळावर केली जाणार आहे.

चक्रवाक बदक पक्षी

गोंडविहीर तलावावर दाखल चक्रवाक बदक (रूडी शेल्डक) हा भगवा, बदामी रंगाचा पिसारा आणि काळी शेपटी असलेला पक्षी लक्षवेधक ठरला आहे. या पक्ष्याचे भारतात कायमस्वरूपी वास्तव्य नाही. हा स्थलांतर करणारा पक्षी आहे. दक्षिण रशिया, मध्य आशिया, चीन आदी प्रदेशातून ऑक्टोबर-नोव्हेंबरच्या सुमारास तो येतो आणि एप्रिलपर्यंत राहतो. हिमालयातील मानसरोवरातील तो पक्षी आहे. रूबाबदार अशी ही बदके आपल्या पिल्लावळांसह भारतभ्रमंतीला येतात. चीन व मंगोलिया देशात या चक्रवाकांना आदर आहे.

आळशी कोकिळा

पक्षी सप्ताहातील पक्षी निरिक्षणादरम्यान कोकीळ पक्षीही चर्चिल्या गेला. कोकीळ पक्षी स्वत:चे घरटे बांधत नाही. कोकीळ नर व कोकिळा मादी हे दोघेही ऐतोबा आहेत. आळशी आहेत. कोकीळा पक्षी कावळ्याच्या घरट्यात अंडी घालते आणि पिल्लाच्या पालनपोषणाची जबाबदारी ती कावळ्यावरच सोपवते. गुंजेसारखे लालभडक डोळे, फिकट पांढुरकी चोच आणि काळभोर रंग नर कोकीळची ओळख. अंगावर पांढऱ्या रंगाची सुबक नक्षीसह चितऱ्या बितऱ्या कबऱ्या रंगाची मादी कोकिळा कुहू-कुहू-कुहू हा आवाज कोकीळ नर पक्ष्याचा तर किक-किक-किक असा आवाज कोकिळेचा म्हणजेच मादी पक्ष्याचा असतो. कोकीळ हा पाँडिचेरी राज्याचा राज्यपक्षी आहे.

गोंडविहीर तलावावर स्थलांतरित पक्षी दाखल होत आहेत. चक्रवाक बदक, हळदीकुंकू बदक, राखी बगळा, जांभळा बगळा, नदीसूरय, कॉमन पोचार्डसह २२ प्रजातींच्या पक्ष्यांची नोंद पक्षीनिरीक्षणात घेण्यात आली आहे.

- अल्केश ठाकरे

पक्षी अभ्यासक, परतवाडा.

 

Web Title: Migratory birds arrive at Gondvihir Lake in Achalpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.