मेळघाटात ४१ गावांतील मजुरांचे स्थलांतर
By Admin | Updated: December 8, 2015 00:13 IST2015-12-08T00:13:29+5:302015-12-08T00:13:29+5:30
मेळघाटातील चिखलदरा तालुक्यातील ४१ गावांत रोजगार नसल्यामुळे येथील शेकडो मजूर कुटुंबासह इतरत्र रोजगारासाठी स्थालांतरित झाल्याची धक्कादायक बाब पुढे आली आहे.

मेळघाटात ४१ गावांतील मजुरांचे स्थलांतर
अत्यल्प पावसाचा परिणाम : पोटाची खळगी भरण्यासाठी
अमरावती : मेळघाटातील चिखलदरा तालुक्यातील ४१ गावांत रोजगार नसल्यामुळे येथील शेकडो मजूर कुटुंबासह इतरत्र रोजगारासाठी स्थालांतरित झाल्याची धक्कादायक बाब पुढे आली आहे. यावर्षी कमी पाऊस झाल्यामुळे दऱ्या-खोऱ्यात शेती असलेल्या अल्पभूधारक शेतकरी व मजुरांवर उपासमारीची वेळी आली आहे. मेळघाटात रोजगारासाठी कुठलेही मोठे उद्योग नसल्यामुळे येथील मजुरांचे जीवनमान शेती व किरकोळ व्यवसायावर अवलंबून असतात. मात्र पावसाअभावी शेतीही फुलवू शकले नाही. त्यामुळे किरकोळ व्यवसायही धोक्यात आले असून रोजगाराचा प्रश्न निर्माण झाला आहे.
यावर्षी तालुक्यातील अंबापाटी, गिरगुटी, खोंगाडा, जामली (आर), कुलागण खुर्द, वस्तापूर, बदनापूर, धरमडोह, बहदारपूर, सप्ती, रोही फाटा, टेंबू्रसोडा, चांदपूर, जैतादेही, भुलेरी, लवदा वन, भवई, ढोमणी फाटा, तेलखार येथील मजूर आपल्या कुटुंबांसह इतरत्र स्थलांतरित झाल्याचा अहवाल आहे.
रामटेक, ढोमणबर्डा, मेनघाट, भांदरी, बोरेटयाखेडा, बारुगव्हाण, बोदू, लाखेवाडा, चोबेदा, आवागड, घना, खडीमल, चुनखडी, माडीझडप, बिच्छुखेडा, नवलगाव, गंगारखेडा, कोटमी, पलशा, जरिदा, मेहरीयाम आदी गावांत रोजगारच नसल्याचे पुढे आले आहे.
खोज संस्थेचे संस्थापक बंड्या साने यांनी शासनाला पत्र पाठवून येथे रोजगार उपलब्ध करण्याची मागणी केली आहे. यासंदर्भात जिल्हाधिकारी किरण गित्ते यांनी दखल घ्यावी, अशी येथील मजुरांची मागणी आहे. (प्रतिनिधी)