सूक्ष्म व लघु उद्योगात अमरावती विभाग माघारला
By Admin | Updated: August 20, 2014 00:38 IST2014-08-20T00:38:55+5:302014-08-20T00:38:55+5:30
पुणे विभाग राज्यात आघाडीवर

सूक्ष्म व लघु उद्योगात अमरावती विभाग माघारला
वाशिम : राज्याच्या आर्थिक जडणघडणीत मोलाचा वाटा उचलणार्या सुक्ष्म, लघु व मध्यम उद्योगधंद्यामध्ये अमरावती विभाग माघारला आहे. २0१३ साली पूणे विभागात राज्यात सर्वाधिक ७५ हजार ८0 तर अमरावती विभागात सर्वात कमी सात हजार ४२६ सुक्ष्म, लघु व मध्यम प्रकारचे उद्योगधंदे यशस्वीपणे उभे राहु शकले. यावर्षीच्या सहा महिन्यांमध्येही हिच परिस्थिती कायम राहीली.
अर्थव्यवस्था मजबूत करणे आणि रोजगाराच्या अधिकाधिक संधी निर्माण करण्याच्या दृष्टिकोनातून राज्य शासन उद्योगधंद्यांना चालना देण्यासाठी अनुदानाची योजना राबवित आहे. अर्थव्यवस्थेला बळकटी देण्याबरोबरच वस्तुनिर्माण आणि सेवा पुरविणार्या उपक्रमांतूनही रोजगार निर्मिती होऊ शकते. वस्तुनिर्माण उपक्रमांचे त्यांच्या यंत्रसामग्रीतील गुंतवणुकीच्या आधारे व सेवा पुरविणार्या उपक्रमांचे साधनसामग्रीच्या मुल्याच्या आधारे सुक्ष्म, लघु व मध्यम उपक्रम (उद्योग) असे वर्गीकरण केले जाते. सुक्ष्म, लघु व मध्यम उद्योगात पूणे विभाग सर्वात आघाडीवर असल्याची साक्ष उद्योग संचालनालयाची आकडेवारी देत आहे. २0१३ या वर्षात पूणे विभागात ७५ हजार ८0 उद्योगांमधून आठ लाख ६८ बेरोजगारांना रोजगार मिळाला. त्याखालोखाल कोकण विभागात २९ हजार ६0३ उद्योगांमधून चार लाख ६३ हजार रोजगारनिर्मिती झाली. नाशिक विभागात २१ हजार ४७७ मधून दोन लाख ७0 हजार तर मुंबई विभागात १८ हजार ३८१ उद्योगांमधून दोन लाख ८५ हजार बेरोजगारांना काम मिळाले. नागपूर विभागात १७ हजार २0८ उद्योगांमधून दोन लाख ११ हजार, औरंगाबाद विभागात ११ हजार ९५४ उद्योगांमधून एक लाख ४९ हजार तर अमरावती विभागात सर्वात कमी सात हजार ४२६ उद्योगांमधून ९0 हजार लोकांना रोजगार मिळाला. उद्योग संचालनालयाच्या राज्यस्तरीय लेखाजोख्यावर नजर टाकली तर सुक्ष्म, लघु व मध्यम स्वरुपाच्या उद्योगधंद्यात अमरावती विभाग मागासलेल्या स्थितीतच असल्याचे स्पष्ट होते.