आत सदस्यांचा गदारोळ ; बाहेर शिक्षकांचे आंदोलन
By Admin | Updated: July 19, 2014 23:41 IST2014-07-19T23:41:48+5:302014-07-19T23:41:48+5:30
शनिवारी महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत सभागृहाच्या आत सदस्य विविध मुद्यावरुन गदारोळ करीत असताना सभागृहाबाहेर शिक्षकवृंद हे थकीत वेतनाची मागणी रेटून होते. शिक्षकांच्या वेतनाचा वाद चिघळू नये,

आत सदस्यांचा गदारोळ ; बाहेर शिक्षकांचे आंदोलन
वेतनाचा प्रश्न : सर्वसाधारण सभेत पोहोचले
अमरावती : शनिवारी महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत सभागृहाच्या आत सदस्य विविध मुद्यावरुन गदारोळ करीत असताना सभागृहाबाहेर शिक्षकवृंद हे थकीत वेतनाची मागणी रेटून होते. शिक्षकांच्या वेतनाचा वाद चिघळू नये, यासाठी विलास इंगोले, बबलू शेखावत, चेतन पवार, हमीदाबी अफजल चौधरी या पदाधिकाऱ्यांसह शिक्षणाधिकारी सविता चक्रपाणी आदींनी शिक्षकांची समजुत काढली. मात्र शिक्षक वृंद हे सर्वसाधारण सभा संपेपर्यत बाहेरच होते.
एप्रिल, मे व जून महिन्याचे थकीत वेतन मिळावे यासाठी महाराष्ट्र राज्य शिक्षक संघाच्या माध्यमातून सतत प्रयत्न सुरु आहे. आयुक्त, महापौर, पदाधिकाऱ्यांना साकडे घातल्यानंतरही वेतन मिळत नसल्याने शिक्षकांनी थेट शनिवारी सर्वसाधारण सभेच्या बाहेर आंदोलन करुन वेतनाची जोरदार मागणी केली. नियमित वेतन मिळत नसल्याने अनेक संकटाच्या सामोरे शिक्षकांना जावे लागत असल्याची बाब यावेळी प्रामुख्याने मांडल्या गेली. येत्या काही दिवसात रमजान ईद असल्याने मुस्लिम समाजाच्या शिक्षकांपुढे बऱ्याच समस्या असल्याची बाब मांडण्यात आली. ईद पूर्वी दोन महिन्यांचे वेतन अदा करण्यात आले नाही तर २३ जुलै पासून बेमुदत शाळा बंद करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे. सभागृहाच्या आत सदस्य वेगवेगळया विषयावर चर्चा करीत असताना शिक्षक बाहेर वेतनासाठी बसले होते. महापालिकेची आर्थिक स्थिती हलाखिची असल्याची बाबही यावेळी चर्चिल्या गेली.
पाच शाळांमध्ये ‘ ई-लर्निंग’ ला मंजुरी
खासगी शाळांच्या स्पर्धेत महापालिकांच्या शाळांचा टिकाव लागावा यासाठी आयुक्त अरुण डोंगरे यांच्या कल्पकतेतून पाच शाळांमध्ये प्रायोगिक तत्वावर ‘ई-लर्निंग’ प्रणाली सुरु करण्यासाठी मंजुरी प्रदान करण्यात आली. वडाळी, नूरनगर, गोपालनगर, भाजीबाजार व बडनेरा येथील शाळांमध्ये ही प्रणाली सुरु करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे.
यावेळी प्रदीप दंदे यांनी विलासनगर येथील शाळेत ही प्रणाली का सुरु करण्यात आली नाही, या विषयावरुन शिक्षण विभागाला धारेवर धरले. निधीची गरज असेल तर वॉर्ड विकासातून घ्या, मात्र विलासनगरातील शाळेत हा उपक्रम राबवा, ही मागणी लावून धरली. उपायुक्त रमेश मवासी यांनी मागणी नुसार या शाळेत ही प्रणाली सुरु करण्याचा शब्द दिला. हा नवीन उपक्रम सुरु केल्याबद्दल मिलिंद बांबल, रिना नंदा, जयश्री मोरे, बबलू शेखावत, निलिमा काळे आदींनी प्रशासनाचे कौतूक केले.