महापालिका निवडणुकीसाठी उमेदवारांची मेरीट चाचणी
By Admin | Updated: October 23, 2016 00:33 IST2016-10-23T00:33:12+5:302016-10-23T00:33:12+5:30
महापालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी प्रमुख पक्षांनी संभाव्य उमेदवारांच्या मेरीट चाचणीला सुरुवात केली आहे.

महापालिका निवडणुकीसाठी उमेदवारांची मेरीट चाचणी
स्वबळाचा नारा : युती, आघाडीबाबत संभ्रम
अमरावती : महापालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी प्रमुख पक्षांनी संभाव्य उमेदवारांच्या मेरीट चाचणीला सुरुवात केली आहे. निवडून येण्याची क्षमता या प्रमुख निकषांवर उमेदवारी देण्याची तयारी पक्षश्रेष्ठींनी चालविली आहे.
राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेल्या आढाव्याच्या पार्श्वभूमिवर शहरातील राजकारण तापू लागले आहे. आघाडी आणि युतीचा निर्णय प्रदेश स्तरावर होईल, असे सांगत असताना चारही प्रमुख पक्षांनी स्वबळाचा नारा दिला आहे. महापालिका निवडणुकीत इच्छुकांची भाऊगर्दी पाहता आणि चार सदस्यीय प्रभाग प्रणाली लक्षात घेऊन काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना आणि भाजपने स्वतंत्ररीत्या इच्छुकांकडून अर्ज मागवले आहेत. युती आणि आघाडीचा निर्णय जिल्हास्तरावरील नेत्यांना घ्यायचा आहे, असे स्पष्ट करत पक्षश्रेष्ठींनी स्थानिक राजकारण्यांमध्ये समेट घडवून आणण्याची तयारी चालविली आहे. मात्र शहराची राजकीय परिस्थिती पाहता युती आणि आघाडी होणार नसल्याचे सध्याचे चित्र आहे.
२२ प्रभागांतून ८७ नगरसेवक निवडण्यासाठीचा प्रभाग रचना आणि आरक्षण निश्चित झाल्यानंतर इच्छुकांनी जोरदार उचल घेतली आहे. भाजपने थेट मुख्यमंत्र्यांच्याच उपस्थितीत आगामी निवडणुकांचा बिगूल फुंकला आहे. त्यापूर्वी शरद पवार यांनीदेखील राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये स्फुल्लिंग चेतविण्याचे काम केले. या हेविवेट नेत्यांच्या मार्गदर्शनाने भाजप आणि राष्ट्रवादी महापालिका निवडणुकीच्या रंगात रंगली आहे. युती आणि आघाडीबाबत प्रदेश आणि जिल्हास्तरावर एकवाक्यता नसल्याने स्थानिक प्रमुखांनी युती-आघाडी होणार नाही, हे गृहित धरून उमेदवारांची मेरीटप्रमाणे चाचपणी चालवली आहे. चारही प्रमुख पक्षांसह बसपा पूर्ण क्षमतेने निवडणूक रिंगणात उतरण्याच्या तयारीत आहेत.