शेतकऱ्यांपेक्षा व्यापाऱ्यांची ज्वारी अधिक
By Admin | Updated: December 9, 2015 00:27 IST2015-12-09T00:27:24+5:302015-12-09T00:27:24+5:30
यावर्षी ज्वारी उत्पादक शेतकऱ्यांची संख्या अधिक होती. मिरची,सोयाबीन, कपाशीने दगा दिल्यावर शेतकऱ्यांची भिस्त ज्वारीवर होती.

शेतकऱ्यांपेक्षा व्यापाऱ्यांची ज्वारी अधिक
शासनाला पडला पेच : खरेदी योजनेत व्यापारी मालामाल
वरूड : यावर्षी ज्वारी उत्पादक शेतकऱ्यांची संख्या अधिक होती. मिरची,सोयाबीन, कपाशीने दगा दिल्यावर शेतकऱ्यांची भिस्त ज्वारीवर होती. परंतु सोयाबीन बुडाल्याने शेतकऱ्यांवर ज्वारी व्यापाऱ्यांना एक हजार १०० रुपये प्रतिक्विंटल भावाने विकण्याची पाळी आली. शासकीय खरेदी उशिरा सुरू झाल्याने व्यापाऱ्यांना याचा फायदा झाला. शासकीय ज्वारी खरेदी योजनेत शेतकऱ्यांपेक्षा व्यापाऱ्यांची ज्वारी अधिक येत आहे. आता शेतकरी कोण आणि व्यापारी कोण हे ओळखणे कठीण झाले आहे. चार दिवसांत एक हजार ५७० रुपये प्रति क्विंटलप्रमाणे ९०० क्विंटल ज्वारीची खरेदी करण्यात आली.
सततच्या नापिकीमुळे उद्ध्वस्त झालेल्या शेतकऱ्यांजवळ पेरणीसह मशागतीची सोय नव्हती. शेतकऱ्यांनी ज्वारीला प्राधान्य देत ज्वारी पेरणी. ज्वारीचे पीक चांगले होते. यामुळे आर्थिक अडचणीत असलेल्या शेतकऱ्याने दसऱ्याच्या सणाला ज्वारी विक्रीला काढली. परंतु व्यापाऱ्यांनी नेमका याच संधीचा फायदा घेत केवळ एक हजार १०० रुपये प्रति क्विंटल भावाने खेडोपाडी जावून ज्वारीची खरेदी केली. अनेक शेतकऱ्यांच्या डोक्यावर कार्जाचा डोंगर असल्याने सावकारांना बेभाव ज्वारी विकली यामध्ये हजारो क्विंटल ज्वारी व्यापाऱ्यांच्या घशात गेली. शासनाने सुध्दा शासकीय ज्वारी खरेदी सुरु केली नसल्याने व्यापाऱ्यांशिवाय पर्याय नव्हता. मात्र, शेतकऱ्यांच्या घरातली ज्वारी संपल्यांनतर ३० नोव्हेंबरपासून शासकीय ज्वारी खरेदीला सुरुवात झाली. शासकीय ज्वारी खरेदीसाठी जय अम्बे टेडर्स रोशनखेडा येथे उघडण्यात आले. या केंद्रावर एक हजार ५७० रुपये प्रति क्विंटल भावाने ेंखरेदीला सुरुवात करण्यता आली. मात्र, शेतकऱ्यांपेक्षा व्यापाऱ्यांची ज्वारी अधिक खरेदी झाल्याची माहिती आहे. शेतकऱ्यांचा सातबारा, ओळख पत्र, तलाठयाचा दाखला आवश्यक असला तरी शेतकऱ्यांच्या नांवे काही व्यापाऱ्यांनी शासनाला ज्वारी विकली आहे. त्यामुळे आता शासनाला शेतकरी कोण आणि व्यापारी कोण हे ओळखणे कठीण झाले आहे. ३० नोव्हेंबर पासून ९०० क्विंटल ज्वारी शासनाने खरेदी केल्याचे सांगण्यात आले. शेतकऱ्यांची ज्वारी नापिकीचा फायदा घेऊन कमी भावात खरेदी करुन व्यापारी आता मालामाल झाल्याचे दिसत आहे. (तालुका प्रतिनिधी)