मेळघाट व्याघ्र प्रकल्प झाला ४३ वर्षांचा
By Admin | Updated: February 23, 2017 00:16 IST2017-02-23T00:16:17+5:302017-02-23T00:16:17+5:30
राज्यात दुसऱ्या क्रमांकाचा मेळघाट व्याघ्र प्रकल्प बुधवारी ४३ वर्षांचा झाला असून वाघांचे संरक्षण, संवर्धनासाठी अधिकारी, कर्मचाऱ्यांनी शपथ घेतली.

मेळघाट व्याघ्र प्रकल्प झाला ४३ वर्षांचा
व्याघ्रस्थापना दिन : उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्यांचा गौरव
अमरावती : राज्यात दुसऱ्या क्रमांकाचा मेळघाट व्याघ्र प्रकल्प बुधवारी ४३ वर्षांचा झाला असून वाघांचे संरक्षण, संवर्धनासाठी अधिकारी, कर्मचाऱ्यांनी शपथ घेतली. व्याघ्रस्थापना दिनाचे औचित्य साधून उल्लेखनिय कामगिरी बजावणाऱ्यांचा गौरव करण्यात आला.
येथील व्याघ्र प्रकल्पाच्या कुलाढाप सभागृहात आयोजित कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक एन.रामबाबू होते. प्रमुख पाहुणे म्हणून मुख्य वनसंरक्षक संजीव गौड, मेळघाट व्याघ्र प्रकल्पाचे क्षेत्र संचालक एम.एस.रेड्डी उपस्थित होते. मेळघाट व्याघ्र प्रकल्पाची निर्मिती, विस्तारलेला परिसर, वाघांची वाढती संख्या, व्याघ्र प्रकल्पातील गावांचे पुनर्वसन, व्याघ्रतस्करी आदींबाबत मंथन करण्यात आले. अद्यापही काही गावांचे पुनर्वसन करायचे असून त्याकरिता निधीची वानवा असल्याची बाब नमूद करण्यात आली. वाघांचे संरक्षण, संवर्धन ही काळाची गरज असून त्याकरिता केंद्रशासन आग्रही असल्याचे एन. रामबाबू यांनी सांंगितले. मागील दोन वर्षांपासून मेळघाटात वाघांची संख्यावाढ ही आनंदाची बाब आहे. मात्र त्या तुलनेत स्थानिकांचा वावर, व्याघ्र प्रकल्पातून वाहतूक ही बाब धोकादायक असल्याचे रेड्डी यांनी सांगितले. व्याघ्र प्रकल्पासाठी अतुलनीय कामगिरी बजावणाऱ्या अधिकारी-कर्मचाऱ्यांना वरिष्ठांच्या हस्ते गौरविण्यात आले. यात सर्वेक्षक विलास देशमुख, एम.एस. झांजुर्णे, एम.एच.खान, एस.एस.बेठेकर, आर. डी.चक्रे,वनमजूर येवले, के.वाय. लोखंडे, के.एन.गुप्ता, बी.सी. भिलावेकर, अनिता बेलसरे, पी.आर. पाटील, के.ए.मेश्राम, पंजाब गवई, जी.डी.रघुवंशी, प्रदीप बाळापुरे, रवि इवनाते, तुषार पवार, अल्केश ठाकरे, आदींना भेटवस्तू, प्रमाणपत्र देऊन गौरविले. तसेच व्याघ्र प्रकल्पासाठी चांगली कामगिरी केल्याबद्दल शहानूर, दाबिया व चुनखडी ग्राम परिसर विकास समितीला गौरविण्यात आले आहे. (प्रतिनिधी)