मेळघाटच्या विद्यार्थ्यांना मिळणार माणुसकीची उब!
By Admin | Updated: December 25, 2014 23:25 IST2014-12-25T23:25:00+5:302014-12-25T23:25:00+5:30
सध्या कडाक्याची थंडी जाणवतेय. शहरातील नागरिकही थंडीने कुडकुडत आहेत. अशा स्थितीत ग्रामीण भागातील त्यातही मेळघाटातील आदिवासी अतिदुर्गम गावात थंडीने कहर केलाय.

मेळघाटच्या विद्यार्थ्यांना मिळणार माणुसकीची उब!
जितेंद्र दखणे - अमरावती
सध्या कडाक्याची थंडी जाणवतेय. शहरातील नागरिकही थंडीने कुडकुडत आहेत. अशा स्थितीत ग्रामीण भागातील त्यातही मेळघाटातील आदिवासी अतिदुर्गम गावात थंडीने कहर केलाय. म्हणूनच जिल्हा परिषद कर्मचारी युनियनने पुढाकार घेऊन अन् कर्मचाऱ्यांच्या वेतनातून थोडी-थोडी कपात करून मेळघाटातील जि.प.शाळेतील चिमुकल्यांना स्वेटर वितरित करण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय त्यांनी अमलातही आणला असून २९ व ३० डिसेंबर रोजी चिखलदरा तालुुक्यात या उपक्रमाला सुरूवात होणार आहे.
एरवी शासकीय कर्मचाऱ्यांवर ‘निर्ढावले’पणाचा शिक्का लावला जातो. इतरांच्या सुख-दु:खाशी काहीही घेणे-देणे नसलेला वर्ग असेही यांच्याबाबत बोलले जाते. परंतु जिल्हा परिषद कर्मचारी युनियनने या सर्व कल्पनांना फाटा दिला. प्रत्यक्ष कृतीतून आपण किती सहिष्णू आणि माणुसकीचा धर्म पाळणारे आहोत, हे त्यांनी दाखवून दिले. समाजभान जपण्याचे उत्तम उदाहरण त्यांनी घालून दिले आहे.
कडाक्याच्या थंडीत कुडकुडणारी मेळघाटातील आदिवासी मुले डोळ्यांपुढे ठेवून जिल्हा परिषद कर्मचारी युनियनने या मुलांना मदत करण्यासाठी पुढाकार घेतला. यासाठी कर्मचाऱ्यांनी त्यांच्या वेतनातून पैसे गोळा करून ५०० आदिवासी विद्यार्थ्यांसाठी स्वेटर खरेदी केले आहेत. या उपक्रमाचा शुभारंभ २४ डिसेंबर रोजी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष सतीश उईके, माजी अध्यक्ष बबलू देशमुख, उपाध्यक्ष सतीश हाडोळे, सभापती गिरीश कराळे, वृषाली विघे, अरूणा गोरले सरिता मकेश्र्वर, सदस्य प्रमोद वाकोडे अभय वंजारी आदींच्या हस्ते करण्यात आली. जिल्हा परिषद कर्मचारी युनियनचे सर्व पदाधिकारी येत्या २९ व ३० डिसेंबर रोजी चिखलदरा तालुक्यातील मोरगढ आणि हत्तीघाट व धारणी तालुक्यातील हिराबंबई, भवई ढाणा, दादरखेडा शिवाझिरी चित्रीकोट, किवटी आदी गावांमधील जिल्हा परिषदेतील शाळेत शिक्षण घेणाऱ्या चिमुल्यांना स्वेटरवाटप करण्यात येणार आहे. यासाठी जिल्हापरिषद कर्मचारी युनियनचे अध्यक्ष पंकज गुल्हाने, ज्ञानेश्र्वर घाटे, श्रीकांत मेश्राम, मंगेश मानकर, अमोल कावरे, ऋषिकेश कोकाटे, प्रशांत धर्माळे, संजय खारकर, तुषार पावडे गजानन जुनघरे, नितीन माहोरे, लाभेश राऊत, तारकेश्र्वर घोटेकर, रूपेश देशमुख, ईश्वर राठोड, लीलाधर नांदे, राजेश पवार, अशोक थोटांगे, रवी धर्माळे, सागर मारोटकर, दहिकर, दुबळे वाकपांजर व अन्य कर्मचाऱ्यांचे सहकार्य लाभले.
जिल्हा परिषद कर्मचारी युनियनच्या सदस्यांनी गोळा केलेल्या पैशातून खरेदी करण्यात आलेले स्वेटर मेळघाटातील चिमुकल्या आदिवासी विद्यार्थ्यांना गारठवणाऱ्या थंडीत ‘मायेची, माणुसकीची ऊब देणार आहेत. समाजातील इतर जबाबदार घटकांनीदेखील या कृतीचा आदर्श घेऊन समाजकल्याणासाठी पुढाकार घेतल्यास अनेक वंचितांना दिलासा मिळू शकतो.