मेळघाट, पोहरा म्हणजे ‘आॅक्सिजन बँक’
By Admin | Updated: June 5, 2015 00:28 IST2015-06-05T00:28:07+5:302015-06-05T00:28:07+5:30
मानवी जीवन हे निसर्गावर अवलंबून आहे, तर निसर्ग हा वृक्ष व वन्यजीवांवर अवलंबून आहे.

मेळघाट, पोहरा म्हणजे ‘आॅक्सिजन बँक’
वैभव बाबरेकर अमरावती
मानवी जीवन हे निसर्गावर अवलंबून आहे, तर निसर्ग हा वृक्ष व वन्यजीवांवर अवलंबून आहे. असेच निसर्गरम्य वातावरणासह जैवविविधतेने संपन्न असलेले जिल्ह्यातील मेळघाट व पोहऱ्याचे जंगल हे अमरावतीकरांसाठी आॅक्सिजन बँकेचे कार्य करीत आहे. मात्र, मानवाच्या अवाजवी हस्तक्षेपामुळे या निसर्गाच्या ठेव्याला प्रदूषणाचे गालबोट लागण्याचा धोका निर्माण झाला आहे.
निसर्गरम्य वातावरणाला लागतेय प्रदूषणाचे गालबोट
अमरावती : आज जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून नागरिकांनी निसर्ग संवर्धनासाठी पुढाकार घेण्याची गरज आहे. अमरावती जिल्ह्यातील ३ हजार चौरस मीटरचा परिसर हा जंगलाने व्यापलेला आहे. त्यामध्ये मेळघाट अभयारण्य, गुगामल उद्यान, ढाकणा, कोलखास, पोहरा व मालखेडचे राखीव जंगल आहे. निसर्गाने या जिल्ह्याला भरभरून जैववैविध्य दिले आहे. ही जंगले पर्यावरण संतुलनामध्ये महत्वाची भूमिका पार पाडत आहेत. जंगल हे पृथ्वीचे फुफ्फुस समजले जाते. हवेतील कार्बनडाय आॅक्साईड शोषून मानवी जीवनासाठी महत्वाचा असणारा आॅक्सीजन जंगलामधून मिळतो. मात्र, गेल्या काही वर्षांत मानवाचा जंगलक्षेत्रातील हस्तक्षेप वाढल्याने पर्यावरण दूषित होत आहे. एकीकडे जागतिक तापमान वाढत चालले आहे. तर दुसरीकडे नागरिकांकडून केल्या जाणाऱ्या जंगलतोडीमुळे व प्रदूषणामुळे पर्यावरणाचा समतोल ढासळत चालला आहे.
३१८ प्रजातींचे पक्षी
जिल्ह्यातील जंगलात ३१८ प्रजातींच्या पक्ष्यांची आजपर्यंत नोंद झाली आहेत. त्यात १२ ते १३ दुर्मीळ पक्ष्यांचा समावेश आहे. ११३ वर्षांपासून न आढळलेला रानपिंगळा सन २००३ मध्ये आढळून आला. रानपिंगळा हा दिनचर असून तो जागतिक कीर्तीचा पक्षी आहे. त्याचप्रमाणे अंडी खाणारा दुर्र्मिळ साप नामशेष झाल्याचे बोलले जात होते. मात्र, हा सापही जंगलात आढळून आला.
२४ मोठे तलाव
जंगलातील नद्या या मानवी जीवनासाठी मोठा आधार आहेत. नदी-नाल्यांच्या या प्रवाहामुळेच जिल्ह्यात २४ मोठे तलाव निर्माण झाले आहेत. जंगल टिकेल तर पाणी मिळेल आणि तरच मानवी जीवनही टिकेल, हा पर्यावरणाचा नियमच आहे.
शिकार, वृक्षतोड, प्रदूषणाचे संकट
जंगलातील वन्यप्राण्यांची शिकार, वृक्षतोड व वाढते प्रदूषण यामुळे पर्यावरणासाठी संकट निर्माण झाले आहे. गेल्या काही वर्षांत वाढलेल्या शिकारीच्या घटनांमुळे वन्यप्राण्यांच्या अधिवासाला धोका निर्माण झाला आहे. प्लास्टिकचा वापर घातक ठरतोय.
तापमान वाढ : गेल्या ५० वर्षांत पृथ्वीच्या तापमानात ०.०५ ते ०.०९ अंश सेल्सिअसने वाढ झाली. पृथ्वीचे तापमान जर असेच वाढले तर १०० ते १५० वर्षांनी तापमानामुळे पृथ्वीवरील जीवसृष्टी नष्ट होईल. या गोष्टीला जगप्रसिद्धी वैज्ञानिक स्टीफन हॉकिन्स यांनी दुजोरा दिला. तसेच ४ ते ५ वर्षात अंटाकर््िटकावरील संपूर्ण बर्फ वितळून समुद्राकाठची बंदरे पाण्यात बुडतील. असे झाल्यास मुंबई, कराची, टोकियो या बंदरांना धोका संंभवतो.
पृथ्वीला धुमकेतूची टक्कर : २० आॅगस्ट २०२६ रोजी ‘स्वीफ्टल’ हा अवाढव्य धुमकेतू पृथ्वीला टक्कर देईल. यापूर्वी २१ जुलै १९९४ रोजी ‘शुमेकर लेव्ही’ या धुमकेतूने गुरू ग्रहाला टक्कर दिली होती. यामुळे गुरूचा पृष्ठभाग काळा झाला होता.