Melghat again in panic | मेळघाट पुन्हा दहशतीत

मेळघाट पुन्हा दहशतीत

ठळक मुद्देपंचक्रोशी हादरली : मोथाखेड्यात वाघाच्या हल्ल्याने ई-वन वाघिणीच्या आठवणी ताज्या

पंकज लायदे।
लोकमत न्यूज नेटवर्क
धारणी : वनविभागाने ब्रम्हपुरीच्या जंगलातील २६ महिने वयाची ई-वन वाघिण मेळघाटच्या डोलार जंगलात सोडली होती. मेळघाट व्याघ्र प्रकल्पाच्या ढाकणा वनपरिक्षेत्रात त्या वाघिणीने एका जणाचा बळी घेतल्यानंतर पकडून तिची प्राणीसंग्रहालयात रवानगी करण्यात आली. पंचक्रोशीतील डझनभर गावांनी त्यावेळी अनुभवलेली दहशत संपुष्टात येत असतानाच, रविवारी मोथाखेड्यात वाघाने आदिवासी शेतक ऱ्यावर हल्ला केला. त्यामुळे राणीगाव, गोलाई, पलसकुंडी, मोथाखेडा येथील शेतकरी बांधवांमध्ये पुन्हा दहशतीचे वातावरण पसरले आहे.

मोथाखेडा येथे रविवारी शेतकरी श्यामलाल सावलकर यांच्यावर वाघाने हल्ला केला. ती घटना उघड झाल्यानंतर या परिसरात दहशत पसरली आहे. सहा महिन्यांपूर्वी डोलार जंगलात अधिवासासाठी आणलेल्या ई-वन वाघिणीने केकडाखेडा, कंजोली, गोलाई, हिराबंबई, राणीगाव, दादरा, ढाकणा या गावांमध्ये चांगलाच धुमाकूळ घातला. पाळीव प्राणी व अनेक आदिवासी महिला-पुरुषांवर हल्ला चढविला. ई-वन वाघिणीने दादरा येथील शोभाराम चव्हाण यांच्यावर हल्ला चढविला होता. त्यांच्या मृत्यूनंतर मंत्रालयातून या वाघिणीच्या बंदोबस्ताचे आदेश निघाले. त्यानंतर तिला नागपूरजवळच्या गोरेवाडा येथील प्राणीसंग्रहालयात नेण्यात आले. ती दहशत आदिवासी या नव्या वाघाच्या हल्ल्यानंतर पुन्हा अनुभवत आहेत.

धूळघाट रेल्वे व गोलाई वनपरिक्षेत्रातील वनअधिकारी व कर्मचाऱ्यांची गावालगतच्या जंगलात गस्त सुरू आहे. तूर्तास वाघ आढळून आलेला नाही. तो जंगलाकडे गेला असल्याची शक्यता आहे. नागरिकांनी घाबरून जाऊ नये. परिसरातील परिस्थिती आटोक्यात आहे.
योगेश तपास, वनपरिक्षेत्र अधिकारी, धूळघाट रेल्वे

Web Title: Melghat again in panic

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.