सखींच्या स्वरांनी वाढविला मेहंदीचा रंग

By Admin | Updated: December 11, 2015 00:21 IST2015-12-11T00:21:24+5:302015-12-11T00:21:24+5:30

शंकरबाबांच्या लाजवंतीसाठी दिग्रसचा श्रीराम जोडीदार म्हणून पुढे आला. शनिवारी या दोघांचा विवाह समारंभ थाटात पार पडणार आहे.

Mehandi's color enhanced by the voice of Sakhi | सखींच्या स्वरांनी वाढविला मेहंदीचा रंग

सखींच्या स्वरांनी वाढविला मेहंदीचा रंग

अमरावती : शंकरबाबांच्या लाजवंतीसाठी दिग्रसचा श्रीराम जोडीदार म्हणून पुढे आला. शनिवारी या दोघांचा विवाह समारंभ थाटात पार पडणार आहे. तत्पूर्वी गुरुवारी लाजवंतीला हळद-मेहंदी लावण्याचा सोहळा यवतमाळच्या मातोश्री दर्डा सभागृहात पार पडला. लाजवंतीच्या हातावर ‘सखी’ मेहंदी लावत असतानाच शहरातील मान्यवर तिच्या डोईवर आशीर्वादाचे हात ठेवत होते. या सोहळ्याचे यजमानपद लोकमत सखी मंचने स्वीकारले होते. सखी मंच प्रमुख सीमा दर्डा यांनी मायेने या सोहळ्याची जबाबदारी सांभाळली.
दुपारी ३ वाजता या सोहळ्यात लाजवंतीचे आगमन झाले. यवतमाळचे पालकमंत्री संजय राठोड यांच्या पत्नी शीतल राठोड लाजवंतीला घेऊन आल्या. यावेळी सीमा दर्डा यांनी स्वत: पुढे होऊन प्रवेशद्वारातच लाजवंतीचे औक्षण केले. फुलांचा वर्षाव करीत तिला सभागृहात आणले. थोड्या वेळातच वर श्रीरामचे आगमन झाले.

मेहंदी नृत्याने केले मंत्रमुग्ध

अमरावती : सर्व मान्यवरांनी श्रीरामचेही औक्षण करून त्याला सभागृहात आणले. या कार्यक्रमाचे यजमानपद सांभाळणाऱ्या यवतमाळ लोकमत सखी मंचच्या प्रमुख सीमा दर्डा म्हणाल्या, महिलांच्या भावविश्वाला बळ देणारे सखी मंच हे व्यासपीठ आहे. महिला सक्षम झाल्या तरच देश सक्षम होईल. २००१ साली यवतमाळात महानायक अमिताभ बच्चन व जया बच्चन यांच्या हस्ते सखी मंचचे उद्घाटन झाले. एकमेकींचे सुख-दु:ख वाटून घेणे, विकासाकरिता झटणे हाच आमचा उद्देश आहे. लाजवंतीच्या मेहंदी कार्यक्रमाचे यजमानपद मिळणे हे आमचे भाग्य आहे. आम्हा असंख्य भगिनींचा आशीर्वाद कायम लाजवंतीच्या पाठीशी राहील. रेणू शिंदे म्हणाल्या, लाजवंतीच्या भावी आयुष्याला आम्हा सर्व सखींच्या शुभेच्छा आहेत. तर सीमातार्इंमुळे या कार्यक्रमात मलाही खारीचा वाटा उचलता आला, अशी कृतज्ञतेची भावना प्रगती धुर्वे यांनी व्यक्त केली.
या मेहंदी सोहळ्याला यवतमाळ लोकमत सखी मंचच्या सदस्यांसह शहरातील अनेक गणमान्य उपस्थित होते. लोकमतचे जिल्हा कार्यालयप्रमुख किशोर दर्डा, प्राचार्य प्रकाश नंदूरकर, निवासी उपजिल्हाधिकारी राजेश खवले, लव दर्डा, जिल्हा परिषद सदस्य मिलिंद धुर्वे, सुरेश राठी, प्रशांत बनगीनवार, सीमा दर्डा, सोनाली दर्डा, पालकमंत्र्यांच्या पत्नी शीतल राठोड, लिना नंदूरकर, रेणू शिंदे, प्रगती धुर्वे, वीरेंद्र अग्रवाल, दुर्गा अग्रवाल, अजय मुंधडा, दत्ता देशपांडे आदी मान्यवर उपस्थित होते.
एकीकडे लाजवंती आणि श्रीराम या उपवर वधू-वरांना मेहंदी लावून देण्यात ‘सखी’ मग्न होत्या, तर त्याचवेळी मंचावर मधुर गीतांची मैफल रंगली होती. नटराज संगीत कला अकादमीच्या चमूसोबत सखी मंचच्या सदस्यांनी एकापेक्षा एक सरस गीतरचना सादर केल्यात. याचवेळी माला, लक्ष्मी, गांधारी, मंजूळा, रूपा या लाजवंतीच्या काही मैत्रिणीही आवर्जून उपस्थित झाल्या.
वझ्झर येथील शंकरबाबा पापळकर यांच्या अनाथालयात वाढलेली लाजवंती आज अनेक नातेवाईकांच्या गर्दीत हरखून गेली होती. संसारीक जीवनात पदार्पण करताना तिच्या मनात उसळणाऱ्या भावनांना सखी मंचच्या सदस्या आपल्या गीतांतून फुलवत होत्या. ‘आये हो मेरी जिंदगी मे तुम बहार बन के’ हे गाणे म्हणजे लाजवंतीच्याच मनाचे बोल होते. सखी मंचच्या अपर्णा शेलार, लीना कळसपूरकर, मीनल ढोणे, वर्षा पडवे, अपर्णा वासनिक, विद्या बेहरे, दीपिका गंगमवार, अमृता कामडी, प्रिती उपलेंचवार, प्राजक्ता हांडवे, कविता डोंगरे यांच्या स्वरांनी लाजवंतीच्या मेहंदी कार्यक्रमाला खरा आनंदाचा रंग चढविला. या गीतांना उत्तम साथ संगत दिली ती नटराज संगीत कला अकादमीच्या चमूने. त्यात किशोर सोनटक्के, बाबा चौधरी, आनंद बिसमोरे, प्रवीण मानकर, प्रकाश कुमरे, मुकुंद शेंडे यांचा समावेश होता.
दरम्यान यवतमाळ पब्लिक स्कूलच्या विद्यार्थिनींनी सादर केलेल्या मेहंदी नृत्याने उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. नाचता-नाचता या चिमुकल्या नर्तकींनी लाजवंती व श्रीराम या उपवर जोडप्यापुढे जाऊन ‘मेहंदी लगा के रखना डोली सजा के रखना’ असे मोहक आर्जवही केले. विश्लाक्षी राखडे, आकांक्षा जऊळकर, विशाखा खेतान, अनुजा चिंतावार, आर्या तोटे, पूर्वा दवे, सानिया सोधी, स्वरा वाढवे या विद्यार्थिनींना यश बोरुंदिया यांचे नृत्यदिग्दर्शन लाभले होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन धनश्री पंडित यांनी केले.

मांडव नव्हे, माहेर अन् पाहुण्यांचा आहेर
मातोश्री दर्डा सभागृह लाजवंतीच्या मेहंदी सोहळ्यासाठी मांडव बनले होते. या मांडवात मान्यवर पाहुण्यांनी लाजवंतीच्या संसारासाठी म्हणून आहेर केला. सोनाली लव दर्डा यांनी साडी सप्रेम भेट दिली. जिल्हा परिषद सदस्य मिलिंद धुर्वे आणि प्रगती धुर्वे या दाम्पत्याने लाजवंतीला गॅस कनेक्शन दिले. कुणी सुटकेस व इतर गृहोपयोगी वस्तू तर कुणी रोख रक्कमही दिली. या रोख रकमेचा लाजवंतीच्या नावे ‘एफडी’ करण्यात येणार आहे.

Web Title: Mehandi's color enhanced by the voice of Sakhi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.