-अखेर जिल्हा दक्षता संनियंत्रण समितीची बैठक
By Admin | Updated: September 10, 2016 00:25 IST2016-09-10T00:25:49+5:302016-09-10T00:25:49+5:30
राष्ट्रीय आरोग्य अभियाना अंतर्गत राबविण्यात येत असलेल्या जिल्हास्तरीय योजनांच्या अंमलबजावणीसाठी ...

-अखेर जिल्हा दक्षता संनियंत्रण समितीची बैठक
१४ सप्टेंबरला आढावा : आरोग्य अधिकाऱ्यांना पत्र, मेळघाटातील माता मृत्यूची माहिती मागविली
अमरावती : राष्ट्रीय आरोग्य अभियाना अंतर्गत राबविण्यात येत असलेल्या जिल्हास्तरीय योजनांच्या अंमलबजावणीसाठी पुनर्गठित केलेल्या राष्ट्रीय आरोग्य अभियानाची जिल्हा दक्षता व संनियंत्रण समितीची २ वर्षांपासून आढावा घेण्यात आलाच नव्हता. ही बाब ‘लोकमत’ने उघडकीस आणताच खासदारांनी याची दखल घेऊन जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांना पत्र पाठवून तीन वर्षांचा लेखाजोखा सादर करण्याचे आदेश दिले. त्यामुळे १४ सप्टेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक आयोजित करण्याचे निर्देश दिले आहेत.
जिल्हा दक्षता व संनियंत्रण समितीची बैठक दर तीन महिन्यांनी घेणे बंधनकारक आहे. या बैठकीचे संनियंत्रण जिल्हा आरोग्य अधिकारी व जिल्हा शल्य चिकित्सकांना संयुक्तरीत्या करावे लागते. ही बैठक घेण्यासाठी खासदारांनी दोन्ही अधिकाऱ्यांना कित्येकदा लेखी व तोंडी सूचना दिली. मात्र जिल्हा आरोग्य अधिकारी दीर्घ रजेवर असल्याने व मंत्रालयीन बैठकीचे कारण देऊन ही बैठक घेण्यास टाळाटाळ केल्याची बाब लोकप्रतिनिधीच्या निदर्शनात ‘लोकमत’ने आणून दिली. याची दखल घेऊन ही बैठक घेण्याबाबतचे पत्र ७ सप्टेंबर रोजी जि.प. प्रशासनाला खा. आनंदराव अडसूळ यांनी पाठविले आहे. त्यानुसार येत्या १४ सप्टेंबरला ही बैठक होणार आहे. यात सन २०१४ ते १७ या कालावधीत राबविण्यात आलेल्या औषध खरेदी प्रक्रियेच्या धारकांची प्रमाणांसह साक्षांकित प्रत सादर करावी, जिल्हास्तरावर उपलब्ध वैद्यकीय अधिकाऱ्यांचे स्थळ व नावासह यादी देण्यात यावी, तसेच रिक्त पदे भरण्यासाठी शासनाकडे करण्यात आलेल्या पाठपुराव्याची माहिती देण्यात यावी, साथरोगामुळे जिल्ह्यात दगावलेल्या रुग्णांची व मेळघाटातील माता, बालमृत्यूंची माहिती खासदारांनी मागितली आहे. (प्रतिनिधी)