वाघाच्या रुपात भेटला सोकारी
By Admin | Updated: January 11, 2017 00:02 IST2017-01-11T00:02:01+5:302017-01-11T00:02:01+5:30
पोहरा-चिरोडी जंगलातील वाघाच्या मुक्त संचाराने इतर वन्यप्राणी भयभीत झाले असून ते सैरावरा होऊन आसरा शोधत आहेत.

वाघाच्या रुपात भेटला सोकारी
वैभव बाबरेकर अमरावती
पोहरा-चिरोडी जंगलातील वाघाच्या मुक्त संचाराने इतर वन्यप्राणी भयभीत झाले असून ते सैरावरा होऊन आसरा शोधत आहेत. वाघाच्या आगमनाने वनविभाग अलर्ट असला तरी वाघाच्या आगमनामुळे पंचक्रोशीतील शेतकरी मात्र सुखावला आहे. वाघाच्या दबदब्यामुळे एरवी शेतीतील पिकांची नासधूस करणारे उपद्रवी वन्यपशू आता शेतांकडे फिरकेनासे झाले आहेत. त्यामुळे वाघाच्या रूपात एकप्रकारचा बेदरकार सोकारीच भेटल्याची सकारात्मक प्रतिक्रिया गावकरी व्यक्त करीत आहेत.
जीवांच्या अन्नसाखळीत वाघाचे सर्वोच्च स्थान आहे. त्याला जंगलाचा राजा असे संबोधले जाते. जंगलातील वन्यप्राण्यांची संख्या नियंत्रित ठेवण्याचे कार्य वाघ करतो. महाराष्ट्र राज्य वनविभागामार्फत सन २०१४-१५ मध्ये वाघांची विशिष्ट गणना करण्यात आली होती. त्यानुसार व्याघ्रप्रकल्प क्षेत्रात एकूण २०३ वाघांचे अस्तित्व सिद्ध झाले. जिल्ह्यातील मेळघाटच्या समृद्ध जंगलातही वाघांचे वास्तव्य असून आता वडाळी व चांदूररेल्वे वनपरिक्षेत्रातही वाघांचा अधिवास आहे. वाघांच्या मुक्त संचारामुळे जंगलाशेजारी राहणाऱ्या ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. मात्र, वाघांच्या दमदार एन्ट्रीमुळे शेतकरी मात्र सुखावले आहेत. वाघांपासून स्वत:चा बचाव करण्याकरिता इस्तत: पळालेले वन्यप्राणी आता शेतीपिकांचे नुकसान करण्यास शेतात शिरत नाहीत. त्यामुळे पीकहानी कमी झाली आहे. शेतकरी परिश्रमपूर्वक पेरणी करतात. मोठ्या जतनाने पिके वाढवितात. मात्र, हाताशी आलेले पीक वन्यपशू नेस्तनाबूत करीत असल्याने शेतकरी हैराण झाले होते. जंगलानजीकच्या शेतात निलगायी, हरीण, रानडुकरे, रोही आदींचा उपद्रव नेहमीचाच झाला होता.
शेतकरीवर्ग निर्धास्त
अमरावती : यामुळे शेतकऱ्यांना आजवर लाखोंचे नुकसान सोसावे लागले. मात्र, जेव्हापासून वाघाने या जंगलात मुक्काम ठोकला आहे तेव्हापासून अन्य वन्यपशुंनी शेतांकडे फिरकरणे बंदच केले आहे. परिणामी पिकांची हानी होत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. जंगलाच्या राजाच्या बिनधास्त वावरामुळे अन्य वन्यपशू दबावात वावरत असून शेतकऱ्यांना मात्र निर्धास्त झोपण्याची संधी मिळाली आहे. याबाबीला वनविभागाने दुजोरा दिला.
ग्रामस्थांनी सोडला सुटकेचा श्वास वन्यपशुंचा उपद्रव झाला कमी
जंगलात वाघाचा वावर असल्याने अन्य वन्यप्राणी सैरावैरा झाले आहेत. वाघाच्या भीतीपोटी ते सुरक्षीतस्थळी गेले आहेत. ही बाब शेतकऱ्यांच्या हिताची ठरत आहे. वाघाचा अधिवास सिद्ध झाल्यानंतर उपद्रवी वन्यप्राण्यांपासून होणार नुकसान कमी झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी सुटकेचा नि:श्वास सोडला आहे.
- यादव तरटे,
वन्यजीव पे्रमी तथा पक्षीप्रेमी