आजारी अवस्थेतही महिला वैद्यकीय अधिकाऱ्याने पुरविली आरोग्यसेवा !
By Admin | Updated: November 30, 2015 00:24 IST2015-11-30T00:24:01+5:302015-11-30T00:24:01+5:30
प्रकृती नादुरूस्त असताना आणि सलाईनद्वारे उपचार सुरू असतानासुध्दा एका महिला वैद्यकीय अधिकाऱ्याने रविवारी रुग्णांना आरोग्य सेवा पुरविली.

आजारी अवस्थेतही महिला वैद्यकीय अधिकाऱ्याने पुरविली आरोग्यसेवा !
अमरावती : प्रकृती नादुरूस्त असताना आणि सलाईनद्वारे उपचार सुरू असतानासुध्दा एका महिला वैद्यकीय अधिकाऱ्याने रविवारी रुग्णांना आरोग्य सेवा पुरविली. मनुष्यबळाअभावी असा प्रसंग जिल्हा सामान्य रुग्णालयातील महिला वैद्यकीय अधिकारी सुनीता मेश्राम यांच्यावर ओढवला.
जिल्हाभरातील गोरगरिब रुग्णांना आरोग्य सेवा पुरविण्याची जाबाबदारी जिल्हा सामान्य रुग्णालयावर आहे. येथे दररोज हजारो रूग्ण उपचारार्थ येतात. मात्र, गेल्या अनेक वर्षांपासून मनुष्यबळाच्या अभावाने आरोग्यसेवेत अडचणी निर्माण होत आहे. रुग्णालयात तज्ज्ञ डॉक्टरांची कमतरता असल्याने रुग्णांना अडचणींचा सामना करावा लागतो. रविवारी सुध्दा मनुष्यअभावी अशीच परिस्थिती निर्माण झाली होती. महिला वैद्यकीय अधिकारी सुनीता मेश्राम यांची प्रकृती बिघडली असतानाही त्यांना रूग्णांना आरोग्य सेवा पुरवावी लागली. सुनीता मेश्राम यांची शनिवारी ड्युटी होती. दरम्यान उलट्यांचा त्रास सुरु झाल्याने अशक्तपणा आला होता. याबाबत त्यांनी अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक अशोक वनकर यांच्याकडून सुटी घेतली होती. मात्र, वेळेवर अन्य डॉक्टर्स कसे येणार? आणि रूग्णांना सेवा कोण पुरविणार, असा प्रश्न वनकर यांच्यासमोर उभा ठाकला. त्यामुळेत्यांची रजा नामंजूर झाली. परिणामी मेश्राम यांना आजारी अवस्थेत रुजू व्हावे लागले. अशाच अवस्थेत त्यांनी दुपारपर्यंत रुग्णांना आरोग्य सेवा पुरविली. (प्रतिनिधी)
मनुष्यबळाचा अभाव, रजा झाली नामंजूर : जिल्हा सामान्य रुग्णालयातील प्रकार
उलट्यांचा त्रास होत असल्यामुळे अशक्तपणा आला होता. त्यामुळे सलाईन घेत आरोग्यसेवा पुरवावी लागली. जिल्हा सामान्य रूग्णालयात पुरेसे मनुष्यबळ नसल्याने सुटी मिळू शकली नाही.
- सुनीता मेश्राम,
वैद्यकीय अधिकारी.
वैद्यकीय अधिकारी सुनीता मेश्राम यांनी प्रकृती बिघडल्याने त्यांनी सुटी मागितली होती. मात्र, वेळेवर अन्य डॉक्टर नसल्याने त्यांना रजा दिली नाही.
- अशोक वणकर,
अतिरिक्त जिल्हा शल्य चिकीत्सक.