अमरावतीमध्ये मेडिकल कॉलेज, विमानतळासह इतर तरतुदी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2021 04:16 IST2021-03-09T04:16:46+5:302021-03-09T04:16:46+5:30
अमरावती : शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाबरोबर वरूड-मोर्शी तालुक्यात संत्राप्रक्रिया केंद्रे, बेलोरा विमानतळाला आवश्यक निधी तसेच मोझरी, कौंडण्यपूर विकासासाठी ...

अमरावतीमध्ये मेडिकल कॉलेज, विमानतळासह इतर तरतुदी
अमरावती : शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाबरोबर वरूड-मोर्शी तालुक्यात संत्राप्रक्रिया केंद्रे, बेलोरा विमानतळाला आवश्यक निधी तसेच मोझरी, कौंडण्यपूर विकासासाठी निधीची तरतूद सोमवारी राज्याच्या अर्थसंकल्पात करण्यात आली आहे. पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे वेळोवेळी केलेल्या पाठपुराव्याला यश मिळाले आहे.
अमरावतीमध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे काम पूर्ण होणार आहे. बेलोरा विमानतळावरील धावपट्टीचा विस्तार, नवीन टर्मिनल बिल्डिंग, रात्रीच्या वेळेला उड्डाणाची सुविधा यासाठीही आवश्यक निधी उपलब्ध होणार आहे. श्रीक्षेत्र मोझरी आणि श्रीक्षेत्र कौंडण्यपूर तसेच वलगावातील संत गाडगेबाबा निर्वाणभूमी येथे पायाभूत सुविधांसाठी निधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. शेकडो वर्षांचा वारसा लाभलेल्या व स्थापत्य शैलीसाठी प्रसिद्ध पौराणिक स्थळांच्या विकासासाठी राज्यात १०१ कोटी नियतव्यय प्रस्तावित केला आहे. त्यातून दर्यापूर तालुक्यातील लासूरच्या आनंदेश्वर मंदिराचाही विकास केला जाणार आहे. शासकीय विदर्भ ज्ञान-विज्ञान संस्थेच्या शतकपूर्तीनिमित्त महाविद्यालयाच्या पायाभूत सुविधांसाठी १० कोटी रुपये निधीची तरतूद करण्यात आली आहे. जिल्ह्यातील महत्वाच्या प्रशासकीय इमारतींसाठी २५५.९६ कोटी रुपये तरतूद अर्थसंकल्पात करण्यात आली आहे.