प्रशासनावर महापौर रुसल्या
By Admin | Updated: February 13, 2015 00:42 IST2015-02-13T00:42:29+5:302015-02-13T00:42:29+5:30
शहराच्या प्रथम नागरिक महापौर चरणजितकौर नंदा या महापालिका प्रशासनावर प्रचंड नाराज आहेत. पालकमंत्री प्रवीण पोटे यांच्या विशेष उपस्थितीत कचरा डेपोचा विषय बुधवारी हाताळला गेला.

प्रशासनावर महापौर रुसल्या
अमरावती : शहराच्या प्रथम नागरिक महापौर चरणजितकौर नंदा या महापालिका प्रशासनावर प्रचंड नाराज आहेत. पालकमंत्री प्रवीण पोटे यांच्या विशेष उपस्थितीत कचरा डेपोचा विषय बुधवारी हाताळला गेला. मात्र महापौर या कक्षात उपस्थित असताना त्यांना या बैठकीला बोलावण्यात आले नसल्याने त्या आयुक्तांवर नाराज आहेत.
महापालिकेत प्रमुख असलेल्या महापौरांना बैठकीला बोलावण्यात आले नसल्याचा विषय गुरुवारी गटनेत्यांमध्ये चांगलाच चर्चिल्या गेला.
पालकमंत्री महापालिकेत येत असेल तर याची माहिती महापौर, स्थायी समिती सभापती, सर्वच गटनेत्यांना अवगत केली पाहिजे. मात्र कम्पोस्ट डेपोचा विषय घिसाळघाईने हाताळण्यात आला हेदेखील खरे आहे. मात्र महापौरांना ही बाब चांगलीच जिव्हारी लागली आहे. महापालिकेत नागरिकांच्या हितासाठी होणाऱ्या प्रत्येक निर्णय प्रक्रियेत महापौरांचा सहभाग आवश्यक आहे. असे असताना प्रशासनाने केलेली चूक कोणत्या टोकावर पोहचते, हे लवकरच दिसून येईल. महापौर चरणजितकौर नंदा या आयुक्त अरुण डोंगरे यांच्यासह अविनाश मार्डीकर, चेतन पवार यांच्यावरही नाराज असल्याचे दिसून येते.
पालकमंत्री पोटे हे जेंव्हा कचरा डेपोचा विषय हाताळण्यासाठी महापालिकेत दाखल झाले, तेव्हा अविनाश मार्डीकर, चेतन पवार बैठकीला उपस्थित होते. महापौर या खोडके गटाच्या असून मार्डीकर, पवार यांनी या बैठकीबाबत कळविले नसल्याने नंदा यांनी या दोघांवरही नाराजी व्यक्त केली आहे. महापौर पदाला मान दिला गेल्याच पाहिजे, अशी भावना चरणजितकौर नंदा यांची आहे. बुधवारी झालेल्या बैठकीनंतर गुरुवारी महापौर प्रचंड नाराज होत्या. त्यांनी हा विषय मनावर लावून घेतला आहे. महापौरांच्या बोलण्यातून त्या प्रशासनावर नाराज असल्याचे स्पष्टपणे जाणवले. महापौरांची ही स्थिती असेल तर सर्वसामान्य सदस्यांबाबत न विचारलेले बरे, असेही त्या म्हणाल्या. (प्रतिनिधी)