सिटी बस कंत्राट मुदतवाढीला महापौरांची नकारघंटा
By Admin | Updated: October 27, 2015 00:27 IST2015-10-27T00:27:11+5:302015-10-27T00:27:11+5:30
शहर बस सेवेच्या कंत्राट मुदतवाढीला महापौरांनी नकार दिला आहे.

सिटी बस कंत्राट मुदतवाढीला महापौरांची नकारघंटा
बस भंगार झाल्याचा आरोप : जागा वापराचे भाडे वसूल करा
अमरावती : शहर बस सेवेच्या कंत्राट मुदतवाढीला महापौरांनी नकार दिला आहे. या आशयाचे पत्र त्यांनी आयुक्तांना दिले असून बस भंगार झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. महापौरांच्या या पत्रामुळे नव्या वादाला सुरुवात झाली आहे. यापूर्वी जेट पॅचरचे खड्डे बुजविण्याचे काम निकृष्ट दर्जाचे असल्याचा आरोप महापौरांनी केला होता, हे विशेष.
महापौर चरणजितकौर नंदा यांनी २३ आॅक्टोबर रोजी आयुक्त चंद्रकांत गुडेवार यांना पत्र दिले असून शहर बस सेवा कामाची मुदत फेब्रुवारी २०१६ मध्ये संपुष्टात येत आहे. १० वर्षांची मुदत अस्तित्वात येण्यापूर्वी नव्याने कंत्राटाची मुदतवाढ देऊ नये, असे महापौरांचे म्हणणे आहे. हल्ली सुरू असलेल्या शहर बसेस भंगार झाल्या आहेत. शहर बस कंत्राटदार असलेल्या अंबा वाहतूक प्रवासी संघाच्या कामकाजावर सदस्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. या प्रस्तावावर सदस्यांची आमसभेत चर्चा झाली. शहर बस रस्त्यावर सुरु राहिल्यास प्रवाशांसाठी ते धोकादायक ठरण्यापूर्वी कंत्राटला मुदतवाढ देऊ नये, या निर्णयाप्रत महापौर पोहचल्या आहेत. स्टार बसेसची प्रक्रिया रेंगाळल्यामुळे प्रवाशांना चांगल्या दर्जाची परिवहन सेवा मिळावी, असे पत्रात म्हटले आहे. त्यामुळे या कंत्राटला मुदतवाढ दिल्यापेक्षा ४ महिन्यांच्या कालावधीत नवीन निविदा प्रक्रिया राबविल्यास ती सोयीची होईल, सदर कंत्राटदारांनी बस ठेवण्यासाठी महापालिकेची जागा वापरली त्याचे भाडे वसूल करण्यात यावे, असे त्यांनी सांगितले.