‘ओव्हर फ्लो’ कम्पोस्ट डेपोची महापौर, आयुक्तांकडून पाहणी
By Admin | Updated: December 8, 2015 00:27 IST2015-12-08T00:27:31+5:302015-12-08T00:27:31+5:30
महापालिकेच्या ‘ओव्हर फ्लो’ झालेल्या सुकळी येथील कम्पोस्ट डेपोची महापौर, आयुक्तांनी सोमवारी पाहणी केली.

‘ओव्हर फ्लो’ कम्पोस्ट डेपोची महापौर, आयुक्तांकडून पाहणी
८० फूट झाली टेकडी : सीमेलगतच्या नागरी वस्त्यांना आरोग्याचा धोका
अमरावती : महापालिकेच्या ‘ओव्हर फ्लो’ झालेल्या सुकळी येथील कम्पोस्ट डेपोची महापौर, आयुक्तांनी सोमवारी पाहणी केली. कचऱ्याची टेकडी ही ८० फुटांच्या जवळपास गेली असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. यामुळे भविष्यात सीमेवरील नागरी वस्त्यांना आरोग्याचा धोका निर्माण होण्याची दाट शक्यता आहे.
शहराची ‘स्मार्ट सिटी’च्या दिशेने वाटचाल सुरू असताना घनकचरा व्यवस्थापनेचा बोजवारा उडाल्याचे चित्र आहे. परंतु कम्पोस्ट डेपोची विदारक परिस्थिती बघण्यासाठी महापौर चरणजितकौर नंदा, आयुक्त चंद्रकांत गुडेवार, स्थायी समिती सभापती विलास इंगोले, राष्ट्रवादी फ्रंटचे गटेनता अविनाश मार्डीकर, झोन सभापती मिलिंद बांबल, नगरसेविका नीलिमा काळे, शिक्षण सभापती अब्दुल रफिक, माजी विरोधी पक्षनेता प्रशांत वानखडे, मो इमरान अशरफी, सार्वजनिक आरोग्य अधिकारी शामसुदंर सोनी, स्वच्छता विभाग प्रमुख अजय जाधव आदी उपस्थित होते.
प्लास्टिकपासून तेल निर्मिती प्रकल्प
अमरावती : यावेळी विलास इंगोले, अब्दुल रफिक, मो. इमरान यांनी ‘ओव्हर फ्लो’ कम्पोस्ट डेपोबाबतची परिस्थिती आयुक्तांच्या पुढ्यात मांडली. नागरी वस्त्यांना भविष्यात कचरा डेपो धोकादायक आहे. त्यामुळे या कचऱ्याची विल्हेवाट लावणे काळाची गरज आहे. विलास इंगोले यांनी यापूर्वी कचऱ्यापासून खत व वीज निर्मितीचा प्रकल्प साकारण्यासाठी ईको फिल कंपनीसोबत करार देखील करण्यात आला. मात्र, खत निर्मितीसाठी जागा हस्तांतरणाचा प्रश्न ऐरणीवर आल्यामुळे कचऱ्यापासून खत निर्मिती हा प्रकल्प तूर्तास गुंडाळल्याची माहिती त्यांनी दिली. दरम्यान आयुक्त गुडेवार यांनी कचरा डेपोची समस्या त्वरेने सोडविली जाईल, असे आश्वासित केले. नव्याने ३०० कंटेनर तर ४० आॅटो रिक्षा खरेदी केले जाईल, असे ते म्हणाले. घनकचरा व्यवस्थापनासाठी नवे तंत्रज्ञान शोधले जात असून लवकरच मुहूर्तमेढ रोवली जाणार असे आयुक्तांनी सांगितले.
कचरा डेपोत कचऱ्यासह प्लास्टिक साठवणूक ही मोठी समस्या असून प्लॉस्टिकपासून तेल निर्मिती प्रकल्प साकारण्यासाठी एजन्सी नेमली जाणार आहे. प्लास्टिकपासून तेल निर्मिती करण्यासाठी अमेरिका येथील एजन्सी लवकरच नेमली जाईल, असे आयुक्त चंद्रकांत गुडेवार यांनी माहिती दिली. नवे तंत्रज्ञानाचा वापर करुन कचरा डेपोची समस्या दूर करु अशी ग्वाही आयुक्तांनी महापौर, पदाधिकाऱ्यांना दिली.