महापौर, उपमहापौरपद अल्पसंख्याकांकडेच !
By Admin | Updated: September 4, 2014 23:26 IST2014-09-04T23:26:33+5:302014-09-04T23:26:33+5:30
महापालिकेत ९ सप्टेंबर रोजी होणाऱ्या महापौर, उपमहापौर पदाच्या निवडणुकीत काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस फ्रंटच्या आघाडीनुसार आ. रावसाहेब शेखावत आणि संजय खोडके हे अल्पसंख्याक समुदायाला

महापौर, उपमहापौरपद अल्पसंख्याकांकडेच !
काँग्रेसचे पक्षादेश जारी : शेखावत, खोडके न्यायाच्या भूमिकेत
अमरावती : महापालिकेत ९ सप्टेंबर रोजी होणाऱ्या महापौर, उपमहापौर पदाच्या निवडणुकीत काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस फ्रंटच्या आघाडीनुसार आ. रावसाहेब शेखावत आणि संजय खोडके हे अल्पसंख्याक समुदायाला न्याय देण्याच्या भूमिकेत असल्याचे चित्र आहे. त्यानुसार महापौर, उपमहापौरपदाचे उमेदवार निश्चित करण्यात आले आहे.
महापालिकेत ८७ सदस्य संख्या असून महापौर, उपमहापौरपदाच्या निवडणुकीत विजयासाठी ४४ सदस्य संख्या आवश्यक आहे. त्यानुसार काँग्रेसकडे २९ तर राष्ट्रवादी काँग्रेस फ्रंटकडे २३ सदस्य आहेत. आघाडीत एकूण ५२ सदस्य असून या संख्याबळाच्या आधारावर महापौर, उपमहापौरांची निवडणूक आघाडी सहजतेने जिंकू शकते, असे राजकीय समीकरण आहे. मात्र राष्ट्रवादी काँगेस फ्रंटमध्ये सुरु असलेल्या अंतर्गत वादाचेही परिणाम महापौर, उपमहापौरपदाच्या निवडणुकीत होण्याची दाट शक्यता आहे. महापौरपदाच्या निवडणुकीनंतर विधानसभा निवडणूक असल्याने या निवडणुकीला अत्यंत महत्त्व आले आहे. आघाडीच्या जुन्या करारानुसार महापालिकेत सत्ता स्थापन व्हावी, यानुसार काँग्रेस, राष्ट्रवादीचे नेते प्रयत्नशील आहेत. मात्र राष्ट्रवादी फ्रंटमधून बाहेर पडून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासोबत असलेल्या ७ सदस्यांना संजय खोडके यांच्या गटाचे नेतृत्व मान्य नसल्याने हे सदस्य वेगळी चूल मांडण्याच्या तयारीत असल्याचे दिसून येते. या सात सदस्यांमध्ये महापौरपदासाठी सपना ठाकूर व जयश्री मोरय्या यांची नावे आघाडीवर आहेत. मात्र, संजय खोडके यांच्या गटाने महापौर पदासाठी अल्पसंख्याकांना न्याय देण्याची भूमिका घेत उमेदवार निश्चित केल्याची माहिती आहे. एवढेच नव्हे तर आ. रावसाहेब शेखावत यांनीसुद्धा उपमहापौर पदासाठी अल्पसंख्याक सदस्यांची वर्णी लावण्याचा निर्णय घेतल्याने महापौर, उपमहापौर या दोन्ही पदावर अल्पसंख्याकांचे वर्चस्व राहणार असल्याचे चित्र आहे. महापालिकेत आघाडीची सत्ता स्थापन व्हावी, यात दुमत नाही. परंतु संजय खोडके यांच्या गटाशी हातमिळवणी न करता काँग्रेसने महापौर, उपमहापौरपदाचे गणित जुळवून आणावे, असा आग्रह राष्ट्रवादीच्या नेत्यांचा आहे. राष्ट्रवादीच्या सात सदस्यांना सोबत घेत इतरही सदस्यांची मदत घेऊन महापौर, उपमहापौर निवडणुकीचा किल्ला लढविण्यासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे काँग्रेसवर दवाब वाढवीत असल्याची माहिती आहे. महापौर, उपमहापौर पदाच्या निवडणुकीला अनुसरुन आ. रावसाहेब शेखावत, पक्षनेता बबलू शेखावत, विलास इंगोले, वसंतराव साऊरकर आदी काँग्रेसचे नेते त्रस्त झाले आहेत. अशातच महापालिकेतील सर्वपक्षीय मुस्लिम सदस्यांनी शेख जफर यांना उपमहापौरपद देण्याची मागणी आ. शेखावत यांच्याकडे रेटून धरल्याने त्यानुसार काँग्रेसला विचार करावाच लागेल, अशी राजकीय गरज निर्माण झाली आहे.