‘जेट पॅचर’च्या कामावर महापौर नाराज
By Admin | Updated: September 28, 2015 00:28 IST2015-09-28T00:28:41+5:302015-09-28T00:28:41+5:30
महापालिकेने दोन वर्षांपूर्वी रस्त्यावरील खड्डे बुजविण्यासाठी अत्याधुनिक नुझिलँड पॅटर्न ‘जेट पॅचर’ प्रणाली लागू केली.

‘जेट पॅचर’च्या कामावर महापौर नाराज
देयके रोखण्यासाठी आयुक्तांना पत्र: वर्षाकाठी एक कोटींच्या खर्चावर प्रश्नचिन्ह
अमरावती : महापालिकेने दोन वर्षांपूर्वी रस्त्यावरील खड्डे बुजविण्यासाठी अत्याधुनिक नुझिलँड पॅटर्न ‘जेट पॅचर’ प्रणाली लागू केली. त्यानुसार खड्डे बुजविण्याचे काम सुरू असताना आता या प्रणालीवर महापौर चरणजितकौर नंदा यांनी प्रचंड नाराजी व्यक्त केली असून कंत्राटदारांचे देयके रोखण्यात यावे, याकरिता आयुक्तांना पत्र दिले आहे.
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शहरात रस्त्यावर खड्डे बुजविण्याचे काम युद्धस्तरावर करण्यात आले. गणेश मिरवणूक, विसर्जनाचे मार्ग खड्डेमुक्त करण्यासाठी महापालिका प्रशासनाने ‘जेट पॅचर’ या अत्याधुनिक प्रणालीचा वापर केला. पाचही झोननिहाय रस्ते बुजविण्याचे काम सुरु असताना महापौर चरणजित कौर नंदा यांनी जेट पॅचर कंत्राटदाराचे देयके अदा करण्यावर आक्षेप नोंदविला आहे. खड्डे बुजविणारी जेट पॅचर कंपनी ही नागपूर येथील असून खड्डे न बुजविता दरवर्षी एक कोटी रुपयांचे देयके अदा करण्यावर सभागृहात आक्षेप घेण्यात आला. विरोधी पक्षनेता प्रवीण हरमकर यांनी काम निकृष्ट केल्याची बाब उपस्थित केली. मात्र या मुद्दावर प्रशासनाने दुर्लक्ष केले होते. त्यामुळे हरमकर यांनी जेट पॅचरच्या कामाबाबत महापौरांकडे तक्रार केली होती. त्यामुळे महापौरांनी जेट पॅचरच्या कामावर प्रश्नचिन्ह निर्माण करुन आयुक्तांना सदर कंत्राटदारांची देयके रोखण्यासाठी आयुक्त चंद्रकांत गुडेवार यांना पत्र दिले.
महापौरांनी देयके रोखण्यासाठी पत्र देताच याविषयी तर्कवितर्क लावले जात आहे. एक कोटी रुपये खड्डे बुजविण्यासाठी खर्च करण्यात येत असेल तर या खड्ड्यांचे आयुष्य हे किमान दोन वर्षे असणे अपेक्षित आहे. परंतु जेट पॅचरने बुजविण्यात आलेले खड्डे हे निकृष्ट दर्जाचे असून ते लवकरच उखडले, असा आरोप महापौरांनी केला आहे. जेट पॅचरच्या खड्डे बुजविण्यावर आक्षेप घेण्यात आल्यामुळे प्रशासन याप्रकरणी देयकांबाबत कोणता निर्णय घेते, याकडे लक्ष लागले आहे.