भूखंड वाटप प्रकरणाचा मुद्दा तापला

By Admin | Updated: April 21, 2015 00:09 IST2015-04-21T00:09:07+5:302015-04-21T00:09:07+5:30

शहरात आरक्षित जागा विकसित करण्याचा प्रस्ताव हा प्रशासनाचा असताना नगरसेवक या जागा विकत असल्याचे चित्र रंगविले जात आहे.

The matter of land allotment matter was heated | भूखंड वाटप प्रकरणाचा मुद्दा तापला

भूखंड वाटप प्रकरणाचा मुद्दा तापला

सदस्य आक्रमक : आता होऊ द्या ‘दूध का दूध, पानी का पानी’
अमरावती : शहरात आरक्षित जागा विकसित करण्याचा प्रस्ताव हा प्रशासनाचा असताना नगरसेवक या जागा विकत असल्याचे चित्र रंगविले जात आहे. एकाही नगरसेवकांनी आरक्षित जागा देण्यासंदर्भात पत्रव्यवहार केला असेल तर त्यांचे सदस्यत्त्व रद्द करा. मात्र, भूखंड वाटपप्रकरणी सत्यता नागरिकांपर्यंत पोहोचवा, आता होऊ द्या ‘दूध का दूध, पानी का पानी’ असे म्हणत नगरसेवक कमालीचे आक्रमक झालेत. भूखंड वाटपावरुन प्रशासनाची कानउघाडणी करताना यात दोषींवर कारवाईची मागणी करण्यात आली.
सोमवारी पार पडलेल्या आमसभेत भूखंड आरक्षणाचे समायोजनाचा विषय चांगलाच गाजला.
आरक्षित जागा विकसित करण्याची जबाबदारी ही प्रशासनाची आहे. त्यानुसार कार्यवाही करणे हे प्रशासनाचे कर्तव्य आहे. मात्र, जागा आरक्षणाच्या आड नगरसेवकच या जागा विकत असल्याचा संदेश शहरात पोहोचविला जात असल्याचा आरोप विलास इंगोले, प्रवीण हरमकर, अविनाश मार्डीकर, बबलू शेखावत, प्रशांत वानखडे, प्रदीप दंदे, प्रकाश बनसोड, प्रदीप बाजड, अर्चना इंगोले, संगीता वाघ, चेतन पवार, अरुण जयस्वाल, अमोल ठाकरे, अजय गोंडाणे, तुषार भारतीय, सुनील काळे, दिगंबर डहाके, संजय अग्रवाल, भूषण बनसोड आदींना केला. (प्रतिनिधी)

आयुक्तांचे चरित्र जणू ‘यू आर डिक्टेटर’
महापालिका आयुक्त गुडेवार यांचे चरीत्र जणू ‘यू आर डिक्टेटर’ अशी भूमिका रंगविली जात आहे. नगरसेवकविरुद्ध आयुक्त असा वाद सुरु झाल्याचे भासविले जात असून कोणीही आकसपूर्ण किंवा द्वेषपूर्ण कर्तव्य करीत नसल्याची बाब प्रदीप दंदे यांनी उपस्थित केली. महापालिकापुरते सिमीत न राहता नगरविकास विभागाचे सचिव होवून राज्यभरात गुडेवार पॅटर्न राबवावा, असा सल्ला प्रदीप दंदे यांनी आयुक्तांना दिला.

मी आहे काय, गोल्डन गँगचा सदस्य?
भूखंड वाटप अथवा जागा आरक्षण विकसित करण्यावरुन प्रशासनाची लक्तरे सदस्य वेशीवर टांगत असताना यापुढे आरक्षित जागा विकसनात पारदर्शकता आणली जाईल, अशी ग्वाही आयुक्त गुडेवार यांनी दिली. चर्चेदरम्यान पुन्हा सदस्यांमधून गोल्डन गँग हा शब्दप्रयोग करण्यात आल्याने आयुक्त गुडेवार यांनी ‘मी आहे काय, मेंबर’ असे म्हणत यापुढे भूखंड आरक्षण विकसित करताना पारदर्शकता आणण्यासाठीच विषय पत्रिकेवरील प्रस्ताव मागे घेत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

Web Title: The matter of land allotment matter was heated

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.